पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेतील गणिताचा पेपर व्हायरल झाल्याप्रकरणी पोलिसांनी चंद्रपूर येथील एका युवकाला अटक केली आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच मंगळवारी (दि. १०) गणित विषयाची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.
याप्रकरणी राज्य मंडळातील अधीक्षक चंद्रकांत वैजनाथ जेवळीकर (रा. धनकवडी) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या तपासात ही प्रश्नपत्रिका टेलिग्रामवरील एका अकाउंटवरून प्रसारित झाल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासात हे अकाऊंट चैतन्य विनोद शेंडे (वय १८, रा. चंद्रपूर) याचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने चंद्रपूर येथे जाऊन शेंडे याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने टेलिग्राम प्लॅटफॉर्मचा वापर करून पेपर कसा व्हायरल केला, याबाबत माहिती दिली. टेलिग्रामवर एकदा पीडीएफ फाइल अपलोड केल्यानंतर ती नंतरही बदलता येते आणि त्यावर ‘एडिट’ असा उल्लेख दिसतो, असे त्याने पोलिसांना सांगितले. शेंडे याने ‘महाराष्ट्र स्टेट बोर्ड २०२६ पेपर्स’ नावाने टेलिग्रामवर एक ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये त्याने कथित प्रश्नपत्रिका अपलोड करून त्या पाहण्यासाठी पासवर्ड ठेवला होता. प्रश्नपत्रिका हवी असल्यास ठराविक रक्कम पाठवावी, असा संदेश त्याने ग्रुपमध्ये प्रसारित केला होता. प्राथमिक चौकशीत अनेक विद्यार्थ्यांकडून त्याने पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे. पैसे मिळाल्यानंतर संबंधितांना त्याने टेलिग्राम अकाउंटवरून ब्लॉक केल्याचेही तपासात उघड झाले आहे. शेंडे याला प्रश्नपत्रिका नेमकी कुठून मिळाली, तसेच त्याने एकूण किती जणांकडून पैसे उकळले, याबाबत सध्या पोलिसांकडून सखोल तपास सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.
Web Summary : A youth from Chandrapur was arrested for leaking the tenth-grade math paper in Pune before the exam. He created a Telegram group, charged students for access, and then blocked them. Police are investigating the source of the leaked paper and the extent of the fraud.
Web Summary : पुणे में दसवीं का गणित का पेपर परीक्षा से पहले लीक करने के आरोप में चंद्रपुर के एक युवक को गिरफ्तार किया गया। उसने टेलीग्राम ग्रुप बनाया, छात्रों से एक्सेस के लिए पैसे लिए, फिर उन्हें ब्लॉक कर दिया। पुलिस लीक हुए पेपर के स्रोत और धोखाधड़ी की सीमा की जांच कर रही है।