महाराष्ट्र दिन विशेष : संयुक्त महाराष्ट्राची रणभूमी मुंबईची; पण बिनीचे शिलेदार पुण्यातलेच..!
By राजू इनामदार | Updated: May 1, 2026 12:00 IST2026-05-01T11:59:45+5:302026-05-01T12:00:44+5:30
Maharashtra Day Special: चळवळीचा लढा प्रत्यक्ष लढला गेला तो मुंबईतच, मात्र पुण्यातून सगळी सूत्रे त्या काळात हलत असत.

महाराष्ट्र दिन विशेष : संयुक्त महाराष्ट्राची रणभूमी मुंबईची; पण बिनीचे शिलेदार पुण्यातलेच..!
पुणे : आज महाराष्ट्र दिन. १०५ मराठी माणसांनी मुंबईत प्राण देऊन मिळवलेले राज्य. सामान्य घरातील प्रत्येक मराठी माणूस संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात उतरला व दिल्लीकरांना अखेर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आणावेच लागले. लढ्याची प्रत्यक्ष रणभूमी मुंबई असली तरी त्या चळवळीला अस्मितेचे इंधन पुरवले ते पुणे शहर व जिल्ह्यानेच! चळवळीचे खंदे नेते तर पुण्याने दिलेच, शिवाय इथल्याच शनिवारवाड्यापुढील सभांनी आंदोलनाचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरवले व दिल्लीश्वरांना त्यापुढे नमावे लागले.
या भावना आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, समाजवादी नेते व पुढे एस. एम. जोशी यांचे स्वीय सहायक झालेले भीमराव पाटोळे यांच्या. पवार यांनी सांगितले की संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कामगार नेते श्रीपाद अमृत डांगे यांचे योगदान अमूल्य आहेच, संपूर्ण कामगार वर्ग त्यांनी या चळवळीमागे उभा केला, मात्र चळवळीला विचारांचा व संघटनेचा भक्कम असा पाठिंबा पुण्याने दिला. चळवळीचे अध्वर्यू असलेले एस.एम. पुण्याचेच. समितीचे अध्यक्ष झालेले केशवराव जेधे हेही पुण्याचेच. जयंतराव टिळक सरचिटणीस होते तेही पुण्याचेच व चळवळीच्या प्रचाराची धुरा आपल्या वाणी व लेखणीने सांभाळलेले आचार्य प्र. के. अत्रे हेही पुण्याचेच!
संयुक्त महाराष्ट्र चळवळ १९५५ ते १९६० म्हणजे महाराष्ट्र अस्तित्वात येईपर्यंत ऐन भरात होती. गिरणी कामगारांसहित राज्यातील समस्त कामगार, शेतकरी, शेतमजूर चळवळीत उतरला होता. तत्कालीन द्वैभाषिक सरकारने अमानुष गोळीबार केला, १०५ जणांचा मुंबईत बळी गेला, मात्र तरीही ही चळवळ हिंसक झाली नाही. चळवळीत काम करणाऱ्यांनी ना कधी कोणावर हल्ला केला, ना कधी कोणाला मारहाण केली. हे यश होते एस. एम. जोशी यांचे! त्यांनी या चळवळीला वैचारिक अधिष्ठान मिळवून दिले. चळवळीसंबधी जे काही लिखाण झाले त्यातही या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे. मग ते अत्रे यांचे कर्हेचे पाणी हे आत्मचरित्र असो किंवा य. दि. फडके यांचे विसाव्या शतकातील महाराष्ट्र (खंड-८)!
केशवराव जेधे समितीचे पहिले अध्यक्ष. शनिवारवाड्यावर संयुक्त महाराष्ट्रासंबंधीची सभा सुरू होती. पुढे अत्रे बोलत होते व सभेचे अध्यक्ष असलेल्या जेधे यांना मागे खुर्चीवर बसलेले असतानाच पक्षाघाताचा तीव्र झटका आला. ते खाली कोसळले. अत्रे यांच्याच गाडीतून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पुढे दोन-तीन दिवसातच त्यांचे निधन झाले. अत्रे यांनी अग्रलेख लिहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
याच शनिवारवाड्यासमोर अत्रे यांच्यासहित शंकरराव मोरे, उद्धवराव पाटील यांच्या संयुक्त महाराष्ट्रावर अनेक सभा होत. विद्यार्थी, सर्वसामान्य नोकरदार, स्वयंसेवी संस्था, संघटना यांना चळवळीच्या मागे उभे करण्यात या सभांचा फार मोठा वाटा होता. स्वत: त्यावेळी विद्यार्थी असलेल्या पवार यांनी सांगितले की, या सभा ऐकल्या की अंगावर काटा फुले. आपल्याला आपला महाराष्ट्र मिळालाच पाहिजे ही भावना जागृत होत असे. त्यातूनच मग तरुणांकडून भिंतीवर पत्रके चिकटवण्याचे, घोषणा लिहिण्याचे, प्रभातफेऱ्या काढण्याचे काम होत असे.
चळवळीचा लढा प्रत्यक्ष लढला गेला तो मुंबईतच, मात्र पुण्यातून सगळी सूत्रे त्या काळात हलत असत. प्रतापगडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पंतप्रधान पंडित नेहरू येणार होते. त्यावेळी तिथे निदर्शने करण्याचा समितीचा निर्णय झाला. त्याची सगळी मोर्चेबांधणी पुण्यातूनच झाली. त्यासाठी सगळे नेते पुण्यात मुक्कामी थांबले होते. इथूनच सगळे निघाले. ती निदर्शने प्रचंड गाजली. पण इतके लोक जमले असूनही एखादा साधा दगडसुद्धा भिरकावला गेला नाही. पुण्यातील बैठकांमध्ये एस. एम. जोशी वारंवार निदर्शने शांततेत होतील असे बजावत होते, त्याचा हा परिणाम होता.
मुंबईप्रमाणे पुणे शहरात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे स्मारक नाही. कारण इथे मोर्चे, आंदोलने, निदर्शने असे काही झाले नाही. लाठीमार, गोळीबार, अटकसत्र असेही काही झाले नाही. मात्र शनिवारवाडा, नेत्यांच्या बैठका होत असलेले तत्कालीन टिळक स्मारक मंदिर, चळवळीतील विद्यार्थ्यांचे केंद्र झालेले फर्ग्युसन महाविद्यालय, सार्वजनिक चर्चेचे व ती चर्चा सगळीकडे पसरवणारी मंडई (या मंडईला पुढे काकासाहेब गाडगीळ यांनी मंडई विद्यापीठ अशी पदवीच दिली.) ही त्या चळवळीची पुणे शहरातील स्मारकेच आहेत असे पवार यांनी सांगितले. पाटोळे यांचीही भावना त्यापेक्षा वेगळी नाही. अबोल व अलिखित असले तरीही, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पुणे जिल्ह्याचे मोलाचे योगदान आहेच! असे त्यांनी सांगितले.
प्रत्यक्ष महाराष्ट्र राज्याची घोषणा झाली त्यावेळी मात्र त्याचे श्रेय चळवळीला किंवा चळवळीतील नेत्यांना मिळाले नाही. संयुक्त महाराष्ट्र समितीतही पुढे मतभेद झाले. त्यानंतर १९६७ मध्ये एस. एम. जोशी पुणे शहरातून खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतरच्या काळात त्यांचे स्वीय सहायक म्हणून बरीच वर्षे काम केलेल्या भीमराव पाटोळे यांना विचारले, “तुम्हाला त्यांच्या बोलण्यातून महाराष्ट्र निर्मितीचे श्रेय मिळाले नाही याची कधी खंत जाणवली का?” पाटोळे यांनी त्यावर सांगितले, “एकदाही, त्यांच्या वागण्या-बोलण्यातून किंवा लिहिण्यातूनही कधी ही खंत जाणवली नाही. फार वेगळा मुशीतील माणूस होते एस.एम.”