Maharashtra School Summer Vacation Schedule 2026: राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना यंदा २ मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात येणार असून, २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी सर्व शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे विदर्भासह संपूर्ण राज्यातील शाळा यंदा प्रथमच एकाच दिवशी सुरू होणार आहेत.
याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी विभागीय उपसंचालक, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. राज्यातील शाळांमध्ये सुटीच्या कालावधीत एकरूपता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सूचनांनुसार, राज्य मंडळाच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना २ मेपासून सुटी लागू होईल. मात्र इतर शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये आधीपासून ठरलेले वेळापत्रक किंवा शैक्षणिक उपक्रम सुरू असल्यास सुटीबाबतचा निर्णय संबंधित शाळांनी स्वतः घ्यायचा आहे. दरम्यान, नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनपासून होणार असली तरी विदर्भातील उष्णतेचा विचार करून तेथील शाळा १५ ते २९ जूनदरम्यान सकाळी ७ ते ११:४५ या वेळेत भरवण्यात येतील. ३० जूनपासून मात्र शाळा नेहमीच्या वेळेनुसार सुरू राहतील.
यापूर्वी विदर्भातील तीव्र उष्णतेमुळे तेथील शाळा राज्यातील इतर भागांच्या तुलनेत साधारण आठ ते दहा दिवस उशिरा सुरू होत असत. मात्र, यंदा शिक्षण विभागाने वेळापत्रकात बदल करत राज्यभर एकसमान प्रारंभाची अंमलबजावणी केली आहे. विदर्भासाठी प्रारंभी सकाळच्या सत्राची विशेष सवलत देण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Web Summary : Maharashtra schools will close for summer vacation on May 2nd and reopen on June 15th. Vidarbha schools will initially operate in the morning due to heat. This uniform schedule aims for consistency across the state, a change from previous years where Vidarbha started later.
Web Summary : महाराष्ट्र के स्कूल 2 मई को गर्मी की छुट्टी के लिए बंद होंगे और 15 जून को फिर से खुलेंगे। विदर्भ के स्कूल गर्मी के कारण शुरू में सुबह चलेंगे। इस समान कार्यक्रम का उद्देश्य राज्य भर में एकरूपता लाना है, जो पिछले वर्षों से एक बदलाव है जब विदर्भ बाद में शुरू हुआ था।