बिबट्याची दहशत! मुलांच्या प्रवासात हल्ल्याची शक्यता; पुणे जिल्ह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रात शाळांच्या वेळात बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 11:39 IST2025-11-25T11:38:28+5:302025-11-25T11:39:27+5:30
बिबट्याच्या हल्ल्यात तीन लोकांना प्राण गमवावे लागले याच पार्श्वभूमीवर, शिरूर-आंबेगाव-खेड-जुन्नर या अतिसंवेदनशील बिबटप्रवण क्षेत्रातील शाळांच्या वेळात बदल केली आहे

बिबट्याची दहशत! मुलांच्या प्रवासात हल्ल्याची शक्यता; पुणे जिल्ह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रात शाळांच्या वेळात बदल
पुणे : मागील महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन लोकांना प्राण गमवावे लागले याच पार्श्वभूमीवर, शिरूर-आंबेगाव-खेड-जुन्नर या अतिसंवेदनशील बिबटप्रवण क्षेत्रातील शाळांच्या वेळात बदल करून सदरची वेळ आता सकाळी ९:३० ते दुपारी ४ अशी निश्चित करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी जुन्नर बिबट प्रवण क्षेत्रातील शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड या तालुक्यांतील बिबट्याच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बिबट प्रवण क्षेत्रात असलेल्या शाळेतील विद्यार्थी सुरक्षितता संबंधित उपाययोजना करण्याबाबत संबंधित पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना परिपत्रक काढून शाळांना सुचित करण्याचे निर्देश दिले आहेत.
पुणे जिल्ह्यात सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षणाची सुविधा जरी एक किलोमीटर व उच्च प्राथमिक शिक्षणाची सुविधा तीन किलोमीटर अंतराच्या आत उपलब्ध असली, तरी बहुतांश विद्यार्थी पायी शाळेत ये-जा करतात. रस्त्याच्या कडेने बिबट प्रवण आपत्ती क्षेत्र, ऊस क्षेत्र, जंगल क्षेत्र, डोंगराळ क्षेत्र अनेक ठिकाणी आहेत. सध्या ऊसतोडीमुळे उसाचे क्षेत्र कमी होत असल्याने बिबट्यांचे हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच, सद्य:स्थितीत हिवाळा ऋतूमुळे संध्याकाळी लवकर अंधार पडत असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. बिबट्यांच्या हल्ल्यामुळे एकही विद्यार्थी क्षतीग्रस्त होऊ नये, विद्यार्थी संध्याकाळी अंधरापूर्वी तसेच रस्त्यावर रहदारी असतानाच घरी पोहचणे आवश्यक आहे. यासाठी बिबट प्रवण आपत्ती क्षेत्रातील शाळांच्या वेळेत सकाळी ९:३० ते दुपारी ४ असा बदल शाळा व्यवस्थापन समिती व शाळा समितीची मंजूरी घेऊन करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वच शाळास्तरावर सकाळच्या परिपाठात सुरक्षिततेबाबत सर्व विद्यार्थ्यांचे तत्काळ मार्गदर्शन व उद्बोधन करण्यात यावे, शाळास्तरावर पालक मेळावे घेऊन शाळेत येताना व शाळा सुटताना पाल्यांना स्वतः घेऊन जाण्याबाबत माहिती द्यावी, तसेच प्रत्येक विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचल्याची वर्गशिक्षकांनी खात्री करणे आवश्यक आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश बिबट प्रवण क्षेत्रातील गटशिक्षणाधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब यांनी दिले आहेत.