कीपॅड मोबाईल, ओटीपी नाही, युपीआय नाही, तरीही पैसे गायब; गिरणी कामगाराचे ७ लाख सायबर चोरट्याकडून लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 12:39 IST2025-11-22T12:39:20+5:302025-11-22T12:39:47+5:30
कोणताही ओटीपी आला नाही. अँड्रॉइड स्मार्टफोन, इंटरनेट बँकिंग किंवा युपीआय चा वापर ते करत नाहीत. तरीही त्यांच्या खात्यातून इतकी मोठी रक्कम चोरीला जाणे आश्चर्यकारकच म्हणायला हवं

कीपॅड मोबाईल, ओटीपी नाही, युपीआय नाही, तरीही पैसे गायब; गिरणी कामगाराचे ७ लाख सायबर चोरट्याकडून लंपास
धायरी: सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हेगाव परिसरातून एक धक्कादायक सायबर फसवणुकीची घटना समोर आली आहे. पिठाच्या गिरणीत कष्ट करून, एकेक पैसा जोडणाऱ्या आणि एका पायाने अपंग असलेल्या कामगाराला सायबर गुन्हेगारांनी लक्ष्य केले आहे. चंद्रकांत शिंदे नावाच्या या कामगाराच्या बँक खात्यातून तब्बल ७ लाख ६१ हजार रुपये गायब झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चंद्रकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नीने गेल्या दहा वर्षांपासून अक्षरशः रक्ताचे पाणी करून हे पैसे साठवले होते. आयुष्यभर कष्ट करून जमा केलेला हा निधी त्यांच्या भविष्याचा आणि उपचारांचा आधार होता. मात्र, क्षणातच सायबर चोरट्यांनी त्यांच्या आयुष्याची पुंजी ओरबाडून घेतली. चंद्रकांत शिंदे यांच्या पत्नी आपले दुःख व्यक्त करताना ओकसाबोकशी रडल्या, त्या म्हणाल्या, आम्ही गेल्या १० वर्षांपासून कष्टाने हे पैसे साठवले, रक्ताचं पाणी करून आम्ही कष्ट केले. आम्हाला आमचे पैसे परत मिळायला हवेत. ज्यांनी हे केले, त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. याबाबत बँकेशी संपर्क केला असता इंटरनेट बँकेवरून पैसे ट्रान्सफर करण्यात आले असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले.
जुन्या पद्धतीचा कीपॅड मोबाईल तरीही पैसे गायब...
या घटनेचा सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे, चंद्रकांत शिंदे हे स्मार्ट फोन वापरत नाही, ते जुना बटनाचा (कीपॅड) मोबाईल वापरतात. त्यांना कोणाचाही ओटीपीसाठी फोन आला नाही. किंवा कोणताही ओटीपी आला नाही. अँड्रॉइड स्मार्टफोन, इंटरनेट बँकिंग किंवा युपीआय चा वापर ते करत नाहीत. तरीही त्यांच्या खात्यातून इतकी मोठी रक्कम चोरीला जाणे, यावरून सायबर चोरट्यांनी अतिशय चलाखीने आणि पूर्वनियोजित पद्धतीने ही फसवणूक केली असावी, अशी भीती व्यक्त होत आहे. याबाबत चंद्रकांत शिंदे यांनी तत्काळ सायबर सेल तसेच बँकेत तक्रार दाखल केली आहे.