कोंढव्यात रमजान खरेदीसाठी आलेल्या इराणी महिलेची पर्स लंपास; अमेरिकन डाॅलर, सोन्याच्या अंगठीची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 17:49 IST2026-03-03T17:47:53+5:302026-03-03T17:49:00+5:30
एका स्टाॅलवर इराणी महिला थांबली असताना बुरखा परिधान केलेल्या २ महिलांनी इराणी महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून पर्स चोरून नेली.

कोंढव्यात रमजान खरेदीसाठी आलेल्या इराणी महिलेची पर्स लंपास; अमेरिकन डाॅलर, सोन्याच्या अंगठीची चोरी
पुणे: कोंढव्यातील कौसरबाग परिसरात रमजाननिमित्त विविध वस्तूंच्या स्टाॅलवर खरेदीसाठी गेलेल्या इराणी महिलेची पर्स चोरून नेल्याची घटना घडली. पर्समध्ये १०० अमेरिकन डाॅलर, भारतीय चलन तसेच सोन्याची अंगठी, असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
याबाबत एका ३२ वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलांनी बुरखा परिधान केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील कौसरबाग परिसरात रजमानमित्त विविध वस्तूंची विक्री करणारे स्टाॅल लावण्यात आले आहेत. तक्रारदार महिला मूळची इराणची आहे. व्यावसायिक व्हिसावर ती भारतात आली असून, गेल्या दहा वर्षांपासून ती भारतात वास्तव्य करत आहे. दि. २८ फेब्रुवारी महिला कोंढव्यातील काैसरबागेत असलेल्या नबाब मोहल्ला येथे खरेदीसाठी आली होती. एका स्टाॅलवर इराणी महिला थांबली होती. त्यावेळी बुरखा परिधान केलेल्या दोन महिला तेथे आल्या. इराणी महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून बुरखा परिधान केलेल्या दोन महिलांनी पर्स चोरून नेली. पसार झालेल्या महिलांचा शाेध घेण्यात येत असून, पोलिसांनी कौसरबाग परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलिस उपनिरीक्षक पंकज खोपडे तपास करीत आहेत.