शेअर ट्रेडिंग आणि आयपीओयामध्ये गुंतवणूक; ज्येष्ठाला ५१ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 18:24 IST2025-10-08T18:24:26+5:302025-10-08T18:24:37+5:30
अवघ्या तीन महिन्यांत तब्बल ५१ लाख ७० हजार रुपये वर्ग करूनही सायबर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही तेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आले

शेअर ट्रेडिंग आणि आयपीओयामध्ये गुंतवणूक; ज्येष्ठाला ५१ लाखांचा गंडा
पुणे: शेअर ट्रेडिंग आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करत सायबर चोरट्याने एका ज्येष्ठाला तब्बल ५१ लाख ७० हजारांचा ऑनलाइन गंडा घातला आहे. ही घटना २ ऑगस्ट ते ११ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत घडली असून, ज्येष्ठाने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक उंड्रीत राहायला असून, २ ऑगस्ट २०२४ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला होता. शेअर ट्रेडिंग आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीचा नफा मिळवून देतो, अशी बतावणी केली. सायबर चोरट्यांनी विश्वास संपादित केल्यानंतर ज्येष्ठाने गुंंतवणूक करण्यास सुरूवात केली. अवघ्या तीन महिन्यांत तब्बल ५१ लाख ७० हजार रुपये वर्ग करूनही सायबर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करत आहेत.
पार्टटाइम नोकरीच्या आमिषाने तरुणाला फसवले
पार्टटाइम नोकरी मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी २२ वर्षीय तरुणाची ३ लाख ३८ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. सोशल मीडिया आयडीद्वारे लिंक पाठवून त्यावर नोंदणी करण्यास सांगून ऑनलाइनरीत्या गंडा घातला आहे. ही घटना ११ ते १६ ऑगस्ट २०२५ कालावधीत शेवाळवाडीत घडली आहे. याप्रकरणी तरुणाने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकासह सोशल मीडिया आयडी धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश जगदाळे करत आहेत.