वारकरी वक्तव्यावरून विकास लवांडे यांच्यावर शाईफेक; कीर्तनकार संग्राम भंडारेसह १२ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 13:34 IST2026-05-10T13:33:22+5:302026-05-10T13:34:09+5:30
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारकरी संप्रदायामध्ये अलीकडे घुसखोरी वाढली असल्याचा गंभीर आरोप केला होता.

वारकरी वक्तव्यावरून विकास लवांडे यांच्यावर शाईफेक; कीर्तनकार संग्राम भंडारेसह १२ जणांवर गुन्हा
उरुळीकांचन / लोणीकाळभोर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी शाईफेक केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास म्हातोबाची आळंदी (ता. हवेली) येथे घडली. वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्यावरून हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर विकास लवांडे यांनी लोणीकाळभोर पोलिस ठाणे गाठले. मात्र, अपेक्षित असा प्रतिसाद न मिळाल्याने लवांडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर कीर्तनकार संग्राम भंडारे,अक्षय कांचन यांच्यासह दहा ते बारा जणांविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम १२७(२), १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारकरी संप्रदायामध्ये अलीकडे घुसखोरी वाढली असल्याचा गंभीर आरोप केला होता. तोच धागा पकडत पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी थेट वारकरी संप्रदायातील २० जणांची नावे घेतली होती. यावरून लवांडे यांच्यावर टीकेची झोडही उठली होती. शनिवारी सकाळी १० वाजता म्हातोबाची आळंदी (ता. हवेली) येथे लवांडे हे दशक्रिया विधीच्या प्रवचनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. संबंधित कार्यक्रम संपल्यानंतर लवांडे हे पुण्याकडे निघाले होते. त्याचवेळी त्यांच्या वाहनाचा पाठलागून करून कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह समर्थकांनी त्यांचे वाहन अडवले. त्यांना खाली उतरवून त्यांच्यावर शाईफेक करत धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यावेळी पिस्तूल दाखवत धमकी दिल्याचा आरोपही लवांडे यांनी केला आहे.
घटनेनंतर लवांडे हे तक्रार नोंदविण्यासाठी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दाखल झाले. तसेच घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यामुळे त्यांच्या सर्थकांनी थेट लोणीकाळभोर पोलिस ठाणे गाठले. सशयितांना तत्काळ अटक करण्यासाठी विकास लवांडे आणि त्यांच्या समर्थकांनी आंदोलन केले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ कीर्तनकार संग्राम भंडारे, अक्षय कांचन यांच्यासह दहा ते बारा जणांविरोधात गुन्हा दाखल केले.
विकास लवांडे यांना दुग्धाभिषेक
विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केल्याची घटना घडल्यानंतर दुपारी त्यांच्या समर्थकांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती. यावेळी आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी विकास लवांडे यांचा दुग्धाभिषेक केला.
वारकरी संप्रदयाला न शोभणारे वर्तन : रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दुपारी आंदोलनस्थळी भेट देत तीव्र निषेध व्यक्त केला. ते म्हणाले, “अशाप्रकारे धमकावत शाईफेक करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते महाराष्ट्र धर्माला आणि वारकरी संप्रदायालाही शोभणारे नाही. खरे वारकरी संतांचा विचार पुढे नेत असतात. ते शिवीगाळ, धमक्या किंवा बंदूक दाखवण्याचे प्रकार करत नाहीत. जर कोणी बंदूक घेऊन फिरत असेल, घुसखोरी करत असेल तर ते अत्यंत गंभीर आहे. “या भोंदू महाराजांच्या गुरुंनी आळंदी आणि नागपूर येथे सुरू केलेल्या शाळांमध्ये बहुजन समाजातील मुलामुलींना प्रवेश दिला जातो का?” असा सवालही केला. दरम्यान, पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करून तातडीने अटक करावी तसेच विकास लवांडे यांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणीही आमदार पवार यांनी यावेळी केली.
शाईफेक प्रकरणाचा आळंदीत निषेध
विकास लवांडे यांच्यावरील शाईफेक केल्याच्या घटनेचा आळंदीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. निषेध आंदोलनावेळी संदीप नाईकरे संग्राम भंडारे यांच्यावर जोरदार टीका करताना म्हणाले, “संग्राम भंडारे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे महाराज आहेत. यापूर्वीही त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात काय भूमिका घेतली होती, हे महाराष्ट्राने पाहिले आहे. स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि वारकरी संप्रदायाचा वापर करण्याचा प्रयत्न काही हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जात आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. या निषेध आंदोलनावेळी विलास कुऱ्हाडे, संजय वडगावकर, योगीराज सातपुते, सुदीप गरुड यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.