पुणे: प्रेमसंबंधातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना मुंढवा भागात घडली. या प्रकरणी टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. प्रवीण धनंजय माने (२४, रा. श्रीमाननगर, शेवाळवाडी, पुणे-सोलापूर रस्ता) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी महेश सरोदे (३५, रा. भीमनगर, मुंढवा) याच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत माने याने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध आहेत. आरोपी सरोदे याने माने याला तरुणीशी असलेले प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले होते. दि. १९ जानेवारी रोजी सरोदे याने माने याला मुंढव्यात बोलावून घेतले. सरोदे आणि त्याच्या बरोबर असलेल्या साथीदारांनी माने याला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पोलिसांकडे तक्रार दिल्यास तुझा गेम वाजवू, अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. माने याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या सरोदे याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शाेध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पिंगुवाले तपास करत आहेत.
Web Summary : In Pune, a youth was stabbed due to a love affair. The gang threatened him after he filed a police complaint. One arrest made; investigation ongoing.
Web Summary : पुणे में प्रेम संबंध के चलते एक युवक पर चाकू से हमला किया गया। शिकायत दर्ज कराने पर गिरोह ने उसे धमकी दी। एक गिरफ्तारी; जांच जारी।