'तुझ्यासाठी मी पुण्यात काम पाहिलंय', भावाला आणण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 19:32 IST2025-05-16T19:32:17+5:302025-05-16T19:32:50+5:30
रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास पुणे- सातारा रस्त्यावर केळवडे येथे तरुणाच्या दुचाकीस मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने ठोकरले

'तुझ्यासाठी मी पुण्यात काम पाहिलंय', भावाला आणण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू
नसरापूर : आपल्या लहान भावासाठी काम लागल्याने कराड येथून भावाला पुण्याकडे आणण्यासाठी निघालेल्या भावाच्या दुचाकीला पुणे-सातारा महामार्गावर केळवडे (ता. भोर) येथे अज्ञात वाहनाने मागून ठोकरल्याने झालेल्या अपघातात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सूरज दिलखुश सूर्यवंशी (वय २९, रा. सध्या स्वारगेट, पुणे; मूळगाव जखीणवाडी, ता. कराड)असे या तरुणाचे नाव आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज हा स्वारगेट येथील संवेदना इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये कामास होता. बुधवारी (ता. १४) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्याने गावी भाऊ धीरज यास फोन करून, ''तुझ्यासाठी मी पुण्यात काम पाहिले आहे, मी आजच गावी येत आहे, आपण दोघे सकाळी पुण्याला परत येऊ,'' असे सांगून तो त्याच्या दुचाकीवरून रात्रीच गावी जखीणवाडी येथे जाण्यासाठी निघाला होता. मात्र, रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास पुणे- सातारा रस्त्यावर केळवडे येथे त्याच्या दुचाकीस मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने ठोकरले. त्यात त्याच्या डोक्यास व छातीस गंभीर दुखापत झाली. अपघातस्थळी असलेल्या स्थानिक तरुणांनी तातडीने पोलिसांना कळवून रुग्णवाहिका बोलावून त्यास दवाखान्यात नेले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
याबाबत त्याचा भाऊ धीरज दिलखुश सूर्यवंशी (वय २५, रा. जखीणवाडी) याने राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस हवालदार सागर गायकवाड तपास करीत आहेत. अपघात करणारे अज्ञात वाहन व चालकाबाबत कोणास माहिती असेल तर ९८२३४००१०० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून केले आहे.