Gautami Patil: मी मदत पाठवली होती, पण संबंधितांनी ती नाकारली, अपघाताबाबत गौतमी पाटीलची स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 20:16 IST2025-10-08T20:14:13+5:302025-10-08T20:16:34+5:30
मी उपचाराचा खर्च करण्यास नकार दिला, हा आरोप चुकीचा आहे. समोरून लाखो रुपयाची मागणी करणारे निरोप येत आहेत, माझ्याशी थेट कोणीही संपर्क साधलेला नाही

Gautami Patil: मी मदत पाठवली होती, पण संबंधितांनी ती नाकारली, अपघाताबाबत गौतमी पाटीलची स्पष्ट भूमिका
पुणे : नवले पुल परिसरात एका कारने रिक्षाला धडक दिल्याने एक जण जखमी झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. अपघातग्रस्त कार नृत्यांगना गौतमी पाटील हिची होती. त्यानंतर जखमी व्यक्तीच्या घरच्यांनी गौतमी पाटील यांच्यावर आरोप केले. या पार्श्वभूमीवर गौतमी पाटील यांनी बुधवारी पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदे घेऊन भूमिका स्पष्ट केली.
ती म्हणाले, देवदर्शनासाठी जातो म्हणून चालकाने गाडी नेली होती. त्यानंतर त्याने अपघात केला. अपघातानंतर त्याने पळून जाणे योग्य नव्हते. तो जे वागला ते चुकीचेच आहे. मात्र, अपघातावेळी मी नसतानाही मला ट्रोल केले जात आहे. ट्रोल होणे माझ्यासाठी नवीन नाही. मात्र, अशाप्रकारे मी तिथे उपस्थित नसताना मला दोष देणे चुकीचे आहे. अपघात झाल्यानंतर मी जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी माझे भाऊ पाठवले होते. मात्र, संबंधितांनी मदत नाकारली, या संबंधीचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे मी उपचाराचा खर्च करण्यास नकार दिला, हा आरोप चुकीचा आहे. समोरून लाखो रुपयाची मागणी करणारे निरोप येत आहेत. माझ्याशी थेट कोणीही संपर्क साधलेला नाही. त्यांची मागणी माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे. त्यामुळे जे काय होईल ते कायद्यानुसार व न्यायालयाच्या आदेशानुसारच होईल, असेही गौतमीने स्पष्ट केले.
अपघात झाल्यानंतर चालकावर कारवाई होते, असे असताना गाडीच्या मालकावर कारवाई करा, अशी मागणी करणे अन्यायकारक आहे. दररोज अपघात होतात. मात्र, गाडीच्या मालकावर गुन्हा दाखल होत नाही. चालकावर केला जातो. मात्र, मी कलाकार असल्याने मला लक्ष केले जात आहे. अपघात झालेली गाडी मी नव्हते, तरीही मला दोषी का दिला जात आहे, हेच कळत नाही. अपघातानंतर मी पोलिसांना हवी ती माहिती व कागदपत्रे दिली आहे. आतापर्यंत मी पोलिसांना हवे ते सहकार्य केले आहे, यापुढेही पोलिसांना सहकार्य करणार आहे, असेही गौतमी म्हणाली.
‘‘मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्यांला लावलेल्या फोनसंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर गौतमी म्हणाली, दादांना अपघाताबद्दल माहिती नव्हती. त्यांनी फोन लावल्यानंतर समोरील अधिकाऱ्यांनी त्यांना व्यवस्थित माहिती दिली. त्यामुळे मला त्यावर काही बोलायचे नाही. मात्र, त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे वाईट वाटले. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला सर्वच बोलतात. मला कोणी चांगले म्हणतच नाहीत. मला सगळे वाईटच बोलतात, मग मी चांगले नृत्य केले असले तरीही वाईट बोलतात. मी दोषी नसतानाही मला दोष देण्यात येत असताना कोणत्याही कलाकाराने किंवा कलाकार संघटनेने आपली बाजू घेतली नाही, किंवा पाठिंब्यासाठी साधा फोनही केला नाही, अशी खंतही गौतमी पाटील हिने व्यक्त केली.