'मी घरातील लोकांच्या योग्यतेची नाही', विवाहित तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 16:10 IST2025-11-28T16:08:41+5:302025-11-28T16:10:47+5:30
मला या कामाचा कंटाळा आल्याने स्वतःहून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे तरुणीने या नोटमध्ये लिहिले असल्याची माहिती समोर आली आहे

'मी घरातील लोकांच्या योग्यतेची नाही', विवाहित तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
पुणे: पुण्याचा मध्यवर्ती भाग असलेल्या बुधवार पेठेत काल सायंकाळी दुर्दैवी घटना घडली. भाऊ रंगारी मार्गावरील एका पाच मजली रहिवासी इमारतीवरून एका महिलेने उडी मारून आत्महत्या केली. गुरुवारी (दि. २७) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पांडुरंग नावाच्या इमारतीत ही घटना घडली आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली तो संपूर्ण परिसर अतिशय गजबजलेला शहरात खळबळ उडाली आहे.
मानसी भगवान गोपालघरे (२०, रा. पांडुरंग इमारत, बुधवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे लग्न झाले असून त्या मूळच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आत्महत्याईपूर्वी महिलेची सुसाईड नोट समोर आली आहे. त्यामध्ये तिने कोणालाही दोषी ठरवले नसून स्वतःहून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगितले आहे.
सुसाईड नोटमध्ये नेमकं काय लिहिलं आहे?
'मी घरातल्या लोकांच्या योग्यतेची नाही. मला या कामाचा कंटाळा आल्याने स्वतःहून हे टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करीत आहे' असे मानसीने या नोटमध्ये लिहिले असल्याची माहिती समोर आली आहे. कामाचा ताण आणि मानसिक अस्वस्थता यामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तरुणीने कामाचा उल्लेख केल्याने ती काय काम करत होती? तिला त्याठिकाणी काही त्रास होता का? याबाबत अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.
तो परिसर अतिशय गजबजलेला
ज्या ठिकाणी ही घटना घडली तो संपूर्ण परिसर अतिशय गजबजलेला असतो. तसेच घारे यांनी ज्या इमारतीवरून उडी मारली त्या इमारतीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी राहत आहेत. या घटनेमुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. उडी मारल्यानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले असता इमारतीखाली रक्ताच्या थारोळ्यात ही महिला पडल्याचे दिसून आले. त्यानंतर नागरिकांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली. विश्रामबाग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा आणि तपासाची प्रक्रिया सुरू केली.