समाजामध्ये किती खालच्या पातळीची विकृती असू शकते; रुपाली चाकणकरांची दमानिया यांच्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 18:45 IST2026-02-06T18:44:33+5:302026-02-06T18:45:21+5:30
अजितदादांच्या कुटुंबावर सातत्याने टीका करणे ही अतिशय घाणेरडी मानसिकता असून दमानिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार

समाजामध्ये किती खालच्या पातळीची विकृती असू शकते; रुपाली चाकणकरांची दमानिया यांच्यावर टीका
पुणे: पार्थ पवार यांना पुण्यातील जमीन घोटाळ्यात क्लिनचीट मिळाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या आहेत. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या दाव्यांचे जोरदार खंडन केले आहे. पार्थ पवारांना कोणतीही क्लिन चीट मिळालेली नाही, उलट त्यांची चौकशी अजूनही सुरूच असल्याचे सांगितले आहे. या संदर्भातील शेवटची बैठक अद्याप होणे बाकी आहे. दमानिया यांनी पुराव्यादाखल काही कागदपत्रांच्या प्रिंट आऊट सादर केल्या आहेत.
शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यात झालेल्या करारावर पार्थ पवार यांचे नाव, सही आणि शिक्का असल्याचा दावा त्यांनी केला आहे. खारगे समिती पार्थ पवारला या प्रकरणातून बाहेर काढू शकत नाही. जर तसा प्रयत्न झाला, तर मी समितीला धारेवर धरीन," असा इशाराही दमानिया यांनी दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत पार्थ पवार या घोटाळ्यातून बाहेर येऊ शकत नाहीत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला असून, प्रसंगी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दमानिया यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
चाकणकर म्हणाल्या, अंजली दमानिया यांना अनेक कपोलो कल्पित कथा सांगायची सवय आहे. अंजली दमानिया यांची आजची पत्रकार परिषद ऐकून समाजामध्ये किती खालच्या पातळीची विकृती असू शकते अशी टीका त्यांनी केली. एखाद्या व्यक्तीला आणि एका कुटुंबाला अंजली दमानिया सातत्याने बदनाम करत असतात. यापूर्वी देखील अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर अनेक आरोप केले, पण त्यातला कुठलाही आरोप त्या सिद्ध करू शकल्या नाहीत. आता त्या पार्थ पवार यांच्यावरती आरोप करत आहेत. ही अतिशय घाणेरडी मानसिकता आहे असे चाकणकर म्हणाल्या.
अंजली दमानिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार
खरंतर या कुटुंबियांनी आपला घरातला माणूस गमावला आहे. अंजली दमानिया पुराव्या अभावी सातत्याने वक्तव्य करुन चर्चेत येत आहेत. ही अतिशय घाणेरडी मानसिकता आहे. अंजली दमानिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.