पुणे : गेल्या तीन दिवसांमध्ये पुणेकरांना उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा मिळाला होता; पण रविवारी (दि.१०) मात्र दुपारी उन्हाचा चटका सोसावा लागला. सायंकाळीदेखील गरम हवा अंगाला झोंबत होती. रस्त्यावरून चालताना प्रचंड उष्णता जाणवत होती. अचानक एवढी उष्णता कशी काय आली? असा सवाल पुणेकर उपस्थित करीत होते. पुण्याचे कमाल तापमान ४१.४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१.७ नोंदवले गेले. त्यामुळे नागरिकांना उकाडा सहन करावा लागला. पुण्यात आणि राज्यात उन्हाचा कडाका प्रामुख्याने कोरड्या उत्तर- पश्चिमी वाऱ्यांमुळे आणि आकाशातील ढगांच्या अभावामुळे वाढला.
शहरात सकाळी हवेत थंडावा जाणवत होता; परंतु त्यानंतर दुपारी सूर्याचा प्रकोप झाल्याचा अनुभव प्रत्येकाला आला. यंदा शिवाजीनगरचे कमाल तापमान ४१.४ इतके नोंदवले गेले. गेल्या दोन- तीन दिवसांपासून ३८ ते ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत होती; पण अचानक रविवारी तापमानाचा पारा ४१ अंशाच्या वर पोहोचला. त्यामुळे रस्त्यावरून फिरताना नागरिकांना उन्हाच्या झळ्या लागत होत्या. शहरात सर्वाधिक तापमान शिवाजीनगरला नोंदले गेले, तर त्यानंतर कोरेगाव पार्क, वडगावशेरी, तळेगाव येथील पारा चाळिशीमध्ये होता.
दिवसभर उन्हाचा कडाका असताना सायंकाळी मात्र आकाशामध्ये ढगांची गर्दी पाहायला मिळाली. हवेमध्ये कोरडेपणा अधिक असल्याने उष्मा प्रचंड होता. नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली. सुटीचा दिवस असूनही नागरिकांनी घराबाहेर पडणे पसंत केले नाही. पुढील दोन- तीन दिवस शहरात कोरडे हवामान राहील. मात्र, दुपारनंतर ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.
शहरातील कमाल तापमान
हडपसर : ३८.२
बालेवाडी : ३८.६
हवेली : ३८.८
पाषाण : ३९.४
मगरपट्टा : ३९.७
चिंचवड : ३९.९
वडगावशेरी : ४०.९
कोरेगाव पार्क : ४०.९
शिवाजीनगर : ४१.४
या महिन्यातील उच्चांकी तापमान
यंदा पुण्यात एप्रिल २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान ४१.८ ते ४२.४ पर्यंत नोंदवले गेले. त्यामध्ये सर्वाधिक कमाल तापमान लोहगाव आणि कोरेगाव पार्क या परिसरात होते; परंतु रविवारी मात्र शिवाजीनगरला सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. हे या मे महिन्यातील उच्चांकी तापमान आहे.
उष्णता कशामुळे?
उत्तर-पश्चिम भारतातून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे वातावरणातील उष्णता साठून राहत आहे, तसेच आकाशात ढगांचे आच्छादन नसल्यामुळे सौर किरणे थेट जमिनीपर्यंत पोहोचत आहेत, ज्यामुळे दिवसाच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. कमी आर्द्रतेमुळे उन्हाच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवत आहेत.
Web Summary : Pune experiences a sudden heat surge, with temperatures soaring to 41.4°C. Dry, north-westerly winds and clear skies intensify the heat. Citizens seek respite as the city grapples with scorching conditions, with no immediate relief expected.
Web Summary : पुणे में अचानक गर्मी बढ़ी, तापमान 41.4 डिग्री सेल्सियस तक पहुंचा। शुष्क, उत्तर-पश्चिमी हवाएं और साफ आसमान गर्मी को बढ़ा रहे हैं। शहर भीषण गर्मी से जूझ रहा है, नागरिकों को राहत की उम्मीद नहीं है।