केदारनाथ यात्रेहून परतताना नंदा देवी एक्स्प्रेसमधून रहस्यमय परिस्थितीत बेपत्ता झालेली कानपूरची प्रज्ञा सिंह सुरक्षित सापडली आहे. ५ मे रोजी मध्यरात्री ट्रेनमधून बेपत्ता झालेली प्रज्ञा ६ दिवसांनंतर बिहारमधील बेगूसराय येथे सापडली. या घटनेमुळे उत्तराखंडपासून उत्तर प्रदेश आणि बिहार पोलिसांपर्यंत सर्वांचीच धावपळ उडाली होती. आता प्रज्ञाने स्वतः पोलिसांसमोर खुलासा केला आहे की, ती बेगूसरायला कशी पोहोचली आणि त्या रात्री ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं होतं.
लक्सरचे एसपी (ग्रामीण) शेखर चंद्र सुयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्ञा सापडल्यानंतर जे सत्य समोर आलं ते धक्कादायक आहे. सुरुवातीला या प्रकरणात अपहरण किंवा अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र प्रज्ञाने सांगितलं की, प्रवासादरम्यान तिचा पती मनीषसोबत एका कारणावरून जोरदार वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात प्रज्ञाने मनीषला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मनीष आपल्या सीटवर झोपी गेला, तेव्हा प्रज्ञा गुपचूप ट्रेनमधून खाली उतरली. रागाच्या भरात तिने हे देखील पाहिलं नाही की ती कोणत्या स्टेशनवर आहे आणि कोणती ट्रेन कुठे जात आहे.
तिकीट नसतानाही बेगूसरायचा प्रवास
पोलीस चौकशीत प्रज्ञाने सांगितलं की, ती स्टेशनवर उभ्या असलेल्या दुसऱ्या एका ट्रेनमध्ये तिकीट नसतानाही चढली होती. ही ट्रेन तिला थेट बिहारला घेऊन जाईल, याची तिला कल्पनाही नव्हती. जेव्हा ती बिहारच्या बेगूसरायला पोहोचली, तेव्हा तिला आपल्या परिस्थितीची जाणीव झाली. तिथे पोहोचल्यानंतर तिने आपल्या आईला फोन करून आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी तिचं लोकेशन शोधून काढलं.
संपूर्ण डबा आणि वॉशरूममध्ये शोधलं
५ मे च्या रात्री ही घटना घडली होती, जेव्हा प्रज्ञा आणि मनीष केदारनाथचं दर्शन घेऊन नंदा देवी एक्सप्रेसने गाझियाबादला परतत होते. मनीषच्या सांगण्यानुसार, हरिद्वार स्टेशनपर्यंत सर्व काही ठीक होतं. मुझफ्फरनगरजवळ जेव्हा मनीषला जाग आली, तेव्हा प्रज्ञा गायब होती. बराच वेळ ती आपल्या जागेवर परतली नाही, तेव्हा मनीषने संपूर्ण डबा आणि वॉशरूममध्ये तिचा शोध घेतला. प्रज्ञाचा फोनही बंद येत होता, त्यानंतर रुरकी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली.
पोलिसांना करावा लागला अडचणींचा सामना
तपासादरम्यान पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. रुरकी आणि मुझफ्फरनगर सारख्या महत्त्वाच्या स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेरे काम करत नसल्याचा आरोप मनीषने केला होता. यामुळे प्रज्ञा कोणासोबत गेली आहे, स्वतः उतरली आहे की तिच्यासोबत काही अपघात झाला आहे, हे शोधणे कठीण झाले होते. पोलिसांनी रेल्वे ट्रॅकवर अनेक किलोमीटरपर्यंत शोधमोहीमही राबवली होती. प्रज्ञाचा शोध लागल्यानंतर पोलिसांनी तिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं आहे. ती सध्या कानपूरमधील आपल्या घरी आहे.
Web Summary : Pragya Singh, missing from a train after Kedarnath, was found in Begusarai. A marital argument led her to impulsively exit the train and board another, ticketless. Police investigation faced CCTV challenges.
Web Summary : केदारनाथ से लौटते समय ट्रेन से लापता हुई प्रज्ञा सिंह बेगूसराय में मिलीं। पति से झगड़े के बाद आवेग में आकर वह ट्रेन से उतर गईं और बिना टिकट दूसरी ट्रेन में चढ़ गईं। पुलिस जाँच में सीसीटीवी की दिक्कतें आईं।