राजगुरूनगरमध्ये वेटरचे भयानक कृत्य! ८ आणि ९ वर्षांच्या दोन बहिणींचा खून, मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 10:11 IST2024-12-26T10:11:02+5:302024-12-26T10:11:45+5:30

नराधमाला फाशी द्या, एन्काउंटर करा, संतप्त नातेवाइकांचा पोलिस ठाण्यासमोर आक्रोश

Horrific act by waiter in Rajgurunagar! Murder of 2 sisters aged 8 and 9, bodies dumped in a water barrel | राजगुरूनगरमध्ये वेटरचे भयानक कृत्य! ८ आणि ९ वर्षांच्या दोन बहिणींचा खून, मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये

राजगुरूनगरमध्ये वेटरचे भयानक कृत्य! ८ आणि ९ वर्षांच्या दोन बहिणींचा खून, मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये

राजगुरुनगर: शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बारमध्ये काम करणाऱ्या वेटरने नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करत तिच्यासह आठ वर्षीय बहिणीला पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. कार्तिकी सुनील मकवाने (वय ९ वर्षे), दुर्वा सुनील मकवाने (वय ८ वर्षे, दोन्ही रा. राजगुरुनगर) अशी मृतांची नावे असून, याप्रकरणी अजय दास (वय ५४ वर्षे, पश्चिम बंगाल) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुकवाने दाम्पत्य मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. कार्तिकी व दुर्वा या दोन्ही बहिणी घराजवळच बुधवारी दुपारी खेळत होत्या. दरम्यान, अचानकपणे त्या गायब झाल्या. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला मात्र, त्या मिळून आल्या नाहीत. त्यानंतर सायंकाळी खेडपोलिसात दोन्ही मुली बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खेड पोलिस आणि पुणे क्राइम ब्रँचने संयुक्तपणे तपास सुरू केला. परंतु, हाती काही लागले नाही. पोलिसांनी ज्या परिसरात मुली खेळ होत्या, त्या परिसरातील घरांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली.
             
मकवाने दाम्पत्य राहत असलेल्या चाळीलगतच्या बारमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या खोलीची झडती घेतली. त्यावेळी अवघे गुडघाभर पाणी असलेल्या एका बॅरलमध्ये या दोन्ही बहिणी मृत अवस्थेत मिळून आल्या. या घटनेमुळे सर्वजण हादरून गेले. या खोलीत राहणाऱ्या अजय दास याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी पुण्यातील एका लॉजवरून दास याला अटक केली. तपासामध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिली.            

नराधमाला फाशी द्या, एन्काउंटर करा, संतप्त नातेवाइकांचा पोलिस ठाण्यासमोर आक्रोश

दोन अल्पवयीन मुलींपैकी एकीवर अत्याचार करून त्या दोघींचा निर्घृण खून करणाऱ्या नराधमाचा एन्काउंटर करा, अशी मागणी मृत मुलीच्या आई- वडिलांसह नातेवाइकांनी केली. सकाळी अकरा वाजल्यापासून खेड पोलिस ठाण्यासमोर नातेवाइक व नागरिकांनी दिवसभर ठिय्या आंदोलन केले. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, एन्काउंटर करा, फाशी द्या, अशी मागणी केली. दरम्यान, तहसीलदार ज्योती देवरे, आमदार बाबाजी काळे यांनी नातेवाइक व आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. आरोपीला फाशी देण्याची मागणी शासन दरबारी करू, मात्र संतप्त झालेले नातेवाइक ऐकत नव्हते. दिवसभर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरूच होते.

...असा घडला प्रकार

दोन्ही बहिणी खेळत असताना अजय दास याने खाऊचे आमिष दाखवून कार्तिकीला वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत घेऊन गेला. त्यापाठोपाठ दुर्वादेखील आली. कार्तिकीवर अत्याचाराचा दासने प्रयत्न सुरू केला असता ती आरडाओरडा करू लागली. त्यापाठोपाठ दुर्वाही ओरडू लागली. त्यानंतर दास याने दुर्वाला बॅरलमध्ये पाण्यात बुडवून मारले. त्यानंतर कार्तिकीवर अतिप्रसंग केला. त्यानंतर तिने माझी बहीण कुठे आहे. मी माझ्या मम्मीला नाव सांगणार असे सांगताच दास याने आपले बिंग फुटणार म्हणून तिलाही बॅरलमध्ये बुडवून मारले. दोघींना बॅरलमध्ये टाकून तो तेथून पळून गेला.

Web Title: Horrific act by waiter in Rajgurunagar! Murder of 2 sisters aged 8 and 9, bodies dumped in a water barrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.