Pune Rain: १ तासापासून पावसाची धुव्वादार बॅटिंग; रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, झाडांच्या फांद्या कोसळल्या, पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 15:43 IST2026-04-02T15:43:16+5:302026-04-02T15:43:41+5:30
ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट सुरु असून शहरातील रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आले आहे, रस्त्यांवर फांद्या कोसळू लागल्या आहेत

Pune Rain: १ तासापासून पावसाची धुव्वादार बॅटिंग; रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, झाडांच्या फांद्या कोसळल्या, पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत
पुणे : पुण्यात दुपारनंतर धुव्वादार पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आले आहे. अनेक भागात रस्त्यावरून वाहने पाण्यात वाहून गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. रस्त्यांवर फांद्या कोसळू लागल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात झालेल्या पावसाने पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पुण्यातील सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, हडपसर, लोहगाव, खराडी, पिंपरी चिंचवड, औंध, बाणेर, बालेवाडी भागांत गारांसह जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र दिसू लागले आहे. अनेकांनी पावसात भिजण्यापेक्षा रस्त्याच्या कडेला आडोशामध्ये थांबणे पसंत केले. ढगांच्या गडगडाटासोबत विजेच्या कडकडाट ऐकू येत आहे. सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला आहे. रस्त्यांवरून नद्या वाहू लागल्याने रस्ते मोकळे दिसू लागले आहेत. बाहेर असलेल्या नागरिकांनी आडोशाला थांबणे पसंत केले आहे. तरी कोणीही झाडाखाली थांबू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. शहरात सोमवारपासून गारांसह मुसळधार पाऊस पडत आहे. दररोज दुपारपर्यंत वातावरण गरम असते. त्यानंतर पावसाला सुरुवात होते. अशा वातावरणामुळे पावसाळा सुरु झाल्यासारखे पुणेकरांना वाटू लागले आहे.
१ तासापासून पावसाची धुव्वादार बॅटिंग; रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, झाडांच्या फांद्या कोसळल्या, पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत#punerain#water#trafficpic.twitter.com/8ebtlXYhjd
— Lokmat (@lokmat) April 2, 2026
पावसाची शक्यता
पुणे शहरात पुढील दोन दिवसांत कमाल आणि किमान तापमानात थोडी वाढ होणार आहे. आकाश दुपारनंतर ढगाळ राहून संध्याकाळी सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुणे शहराला भारतीय हवामानशास्त्र विभागाने येलो अलर्ट जाहीर केला आहे.