पुण्यात मुसळधार; सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची जोरदार बॅटिंग, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 15:25 IST2025-05-28T15:24:55+5:302025-05-28T15:25:24+5:30

पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून नागरिकांना या पाण्यातून वाट काढताना समस्या निर्माण झाली

Heavy rain in Pune Heavy rains which had been resting since morning battered the roads like rivers | पुण्यात मुसळधार; सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची जोरदार बॅटिंग, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप

पुण्यात मुसळधार; सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची जोरदार बॅटिंग, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप

पुणे : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून शहरात पावसाचा जोर कायम आहे. मॉन्सूनच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात मंगळवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला. शहरात दिवसभरात १५.७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर बुधवारी सकाळपासून पाऊस थांबला होता. मात्र दुपारच्या वेळेत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.  

सुरुवातीला पूर्वमोसमी व त्यानंतर मॉन्सूनच्या आगमनामुळे शहरात तसेच जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता. शहरात तसेच जिल्ह्यातील दौंड, बारामती, शिरूर व इंदापूर तालुक्यात रविवारी व सोमवारी पावसाने धुमाकूळ घातला. मात्र, मंगळवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला. दरम्यान, शहरात बुधवारी सकाळपासून वातावरण ढगाळ होते. आता दुपारनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढताना समस्या निर्माण झाली.  भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार बुधवारी शहरात ढगाळ वातावरण कायम राहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. तर घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे तसेच मध्य प्रदेशातील प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढला असून, येत्या तीन ते चार दिवसांत राज्यातील ८० टक्के भाग मॉन्सूनने व्यापला जाणार आहे. पूर्व मोसमी पावसाने ओढ दिलेल्या उत्तर महाराष्ट्रातही पुढील तीन ते चार दिवसांत चांगला पाऊस होण्याची शक्यता वाढली आहे. 

Web Title: Heavy rain in Pune Heavy rains which had been resting since morning battered the roads like rivers