Pune Rain: पुण्यात मुसळधार! नाले तुंबले, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, महापालिकेचे पितळ झाले उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 10:43 IST2025-05-21T10:42:04+5:302025-05-21T10:43:08+5:30
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईसाठी दरवर्षी कोटयावधी रुपयांच्या निधी खर्च केला जातो

Pune Rain: पुण्यात मुसळधार! नाले तुंबले, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, महापालिकेचे पितळ झाले उघड
पुणे: सकाळी ऊन आणि दुपारनंतर मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मंगळवारी (दि. २०) जोरदार पाऊस पडला. अनेक भागात नाले, चेंबर तुंबले होते. त्यामुळे रस्त्यावर पाणीचपाणी झाले. तुंबलेले चेंबर मोकळे करण्यासाठी महापालिका कर्मचारी, अधिकारी फिल्डवर पहायला मिळाले. शहरात ढगफुटीसदृश पावसाची शक्यता असल्याने वेधशाळेने पुण्याला 'ऑरेंज अलर्ट' दिला आहे. पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत झाला.
शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडत आहे. वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसामुळे वाहनधारकांची तारांबळ होत आहे. आज दिवसभरात शिवाजीनगर ७ मिमी, लोहगाव ६ मिमी, तर पाषाण परिसरात सर्वाधिक ५६ मिमी पावसाची नोंद झाली. सकाळपासून शहरात ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. त्यामुळे दिवसभर उकाड्याने पुणेकर हैराण झाले. दुपारी साडेचारनंतर आकाशात काळे ढग भरून आले आणि तासाभरातच शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींना सुरुवात झाली. कोथरूड, वारजे, औंध, एनडीए, पाषाण, शिवाजीनगर, विश्रांतवाडी, येरवडा, खराडी, हडपसर, कोरेगाव पार्क, मगरपट्टा, फुरसुंगी, कात्रज, धनकवडी, हांडेवाडी, नांदेड फाटा, सिंहगड रस्ता, खडकवासला या परिसरात पावसाच्या जोरदार सरी पडल्या. नाले आणि पावसाळी गटारांच्या साफसफाईची मुदत ही ३१ मे पर्यंत असते. पहिल्यांदा मे महिन्याच्या पंधरा तारखेपासूनच जोरदार अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. शहरामधील मध्यवर्ती भागातील शिंदे आळी व इतर ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार झाले.
अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर
शहरात मंगळवारच्या पावसाने अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. रस्त्यावर साचलेले पाणी काढून देण्यासाठी पुणे महापालिकेचे कर्मचारी प्रत्यक्ष फिल्डवर हजर होते. चेंबरमध्ये अडकलेले प्लास्टिक आणि कचरा हे कर्मचारी काढत होते. पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. या सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवून होते. त्यांनी रात्री वेळोवेळीकर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
रस्त्यात पडला मोठा खड्डा
लालबहादूर शास्त्री रस्त्यावरून मांगीर बाबा चौकात रस्ते खोदाई केलेली आहे. पावसात त्या ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा पडल्यानंतर भर पावसात पालिका कर्मचाऱ्यांनी तिथे बॅरिगेट्स लावलेले आहेत.
दरवर्षी कोटयावधी रुपयांच्या निधी खर्च
पालिकेकडून दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात नालेसफाईची कामे केली जातात. त्याअंतर्गत कल्व्हर्ट्स बांधणे, पावसाळी पाण्याची लाईन टाकणे, रस्त्यावरचे खड्डे बुजविणे, ड्रेनेजची दुरुस्ती करणे, पावसाळ्यात जिथे पाणी शिरते, अशा धोकादायक ठिकाणचे आपत्ती व्यवस्थापन आदी कामांचे नियोजन केले जाते. त्यासाठी बजेटमध्येही तरतूद केली जाते. मेअखेरपर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण करणे अपेक्षित असते. मात्र, ती होत नाहीत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईसाठी दरवर्षी कोटयावधी रुपयांच्या निधी खर्च केला जातो. नाल्याची साफसफाई करून तो गाळ शेजारीच ठेवला जातो. काही ठिकाणी तो गाळ आणि घाण काढून घेतली जाते तर काही नाल्यामध्ये काही नाले आणि ओढयामध्ये राडारोडा टाकला जातो. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही.