शेळीचे पिल्लू वाचवताना हृदयद्रावक घटना; दाम्पत्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, पाडव्याच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 12:57 IST2025-10-23T12:57:18+5:302025-10-23T12:57:49+5:30
Daund Electric Shock Accident: पिल्लाला वाचवण्यासाठी पत्नी धावली त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला, ते पाहून पतीही धावले दोघांचाही या घटनेत मृत्यू झाला

शेळीचे पिल्लू वाचवताना हृदयद्रावक घटना; दाम्पत्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, पाडव्याच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
केडगाव: दौंड तालुक्यातील नानगाव येथे दिवाळी पाडव्याच्या दिवशी सायंकाळी ४.३० च्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. विजेच्या धक्क्याने एका विवाहित पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका शेळीच्या पिल्लाला वाचवण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडली. राजाराम बापूराव खळदकर वय ५३ आणि त्यांची पत्नी मनीषा राजाराम खळदकर वय ४९ (दोघेही रा. नानगाव, ता. दौंड, जि. पुणे) अशी मृत पावलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. बुधवार, दि. २२ (दिवाळी पाडवा) रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास ही घटना घडली.
नेमके काय घडले?
गावातील राजाराम खळदकर यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटारीच्या पॅनल बॉक्सला काही कारणास्तव विद्युत प्रवाह (करंट) उतरला होता. त्यांच्या शेळीचे पिल्लू त्या परिसरात चरत असताना त्या पॅनल बॉक्सला चिकटले. हे पाहून मनीषा खळदकर ते पिल्लू वाचवण्यासाठी धावल्या, पण त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्या पॅनल बॉक्सला चिकटून बसल्या. पत्नीला विजेचा धक्का बसलेला पाहून राजाराम खळदकर त्यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावले, पण दुर्दैवाने तेही विद्युत प्रवाहात ओढले गेले. या अत्यंत दुर्दैवी घटनेत शेळीच्या पिल्लासह मनीषा खळदकर आणि राजाराम खळदकर यांचा जागीच मृत्यू झाला.
सर्वत्र हळहळ
ही भयंकर घटना नानगावमध्ये समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. तात्काळ दोघांनाही केडगाव येथील मयुरेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, डॉ. बी. बी. खळदकर यांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी मृतदेह यवत येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. राजाराम खळदकर यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असून दोघेही शालेय शिक्षण घेत आहेत. ऐन दिवाळीत खळदकर कुटुंबावर कोसळलेल्या या संकटामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृत पती-पत्नीवर दि. २२ रोजी उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.