पुण्यात प्रदूषणाची धोकादायक पातळी; ५० मीटरपेक्षा उंच इमारतींच्या बांधकामासाठी उभारा २५ फुटांची पत्रे
By राजू हिंगे | Updated: November 9, 2023 15:17 IST2023-11-09T15:17:30+5:302023-11-09T15:17:48+5:30
शहरांमध्ये सुरू असलेली बांधकामे आणि उड्डाणपूल आणि मेट्रो प्रकल्पांच्या ठिकाणी धोकादायक धूलिकण रोखणे आवश्यक

पुण्यात प्रदूषणाची धोकादायक पातळी; ५० मीटरपेक्षा उंच इमारतींच्या बांधकामासाठी उभारा २५ फुटांची पत्रे
पुणे : वाढत्या धूलिकणांमुळे पुण्यासह देशभरातील मोठ्या शहरांमध्ये हवा प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली आहे. त्यामुळे पुण्यात 50 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या आणि 1 एकरपेक्षा अधिक जागेतील बांधकाम प्रकल्पाभोवती २५ फूट उंचीचे पत्रे उभारण्यात यावे. धूलिकण रोखण्यासाठी स्मॉग गन वॉटर स्प्रिंकलरचा वापर बांधकामाच्या वेळी करावा अशा मार्गदर्शक सूचना राज्य पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाने जाहीर केल्या आहेत.
पुणे शहर हवा प्रदूषणात धोकादायक पातळीवर आहे. त्यामुळे प्रदूषण लक्षात घेऊन शहरांमध्ये सुरू असलेली बांधकामे आणि उड्डाणपूल आणि मेट्रो प्रकल्पांच्या ठिकाणी धोकादायक धूलिकण रोखणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्य पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाने मार्गदशक सुचना दिल्या आहेत. सध्या सुरू असलेली बांधकामे, पाडण्यात येत असलेली बांधकामे आणि प्रकल्पांच्या कामावर ओले हिरवे कापड, ओले ज्यूट कापड अथवा ताडपत्रीने झाकणे बंधनकारक करण्यात आले. बांधकाम कामगारांना मास्क, गॉगल बंधनकारक केला जाणार आहे. बांधकामाच्या ठिकाणी माती, खडी, वाळू झाकून ठेवावी.उड्डाणपूल यांसारख्या सर्व कामांच्या ठिकाणी किमान 20 फूट बॅरिकेडिंग असणार आहे. राडारोडा टाकल्यास वाहने जप्त केली जाणार आहेत. याबाबतच्या सूचना बांधकाम व्यावसायिकांना देण्यात येणार असून त्याची तातडीने अंलबजावणी केली जाणार आहे. याबाबत आदेश काढण्यात आल्यानंतर या उपाययोजना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहिल्या जाणार असून त्याचे चित्रीकरणही केले जाणार आहे. त्याची अंमलबजावणी होत नसल्यास ही बांधकामे थांबविणे अथवा सील केली जाणार आहेत.