या मार्गावर यमराजाने मुक्कामच ठोकला आहे की काय? कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल रस्ता बनला मृत्यूचा सापळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:36 IST2025-11-15T11:35:33+5:302025-11-15T11:36:06+5:30
रिंग रोड वेळेत झाला असता तरी जीव वाचले असते. दहा वर्षांत प्रस्तावित दोनपैकी एक जरी रिंग रोड झाला असता तरी अनेकांचे जीव वाचले असते.

या मार्गावर यमराजाने मुक्कामच ठोकला आहे की काय? कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल रस्ता बनला मृत्यूचा सापळा
कल्याणराव अवताडे/पांडुरंग मरगजे
धायरी/धनकवडी : कात्रजचा नवीन बोगदा ते नवले पूल रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला आहे. या पुलावर गुरुवारी (दि. १३) भीषण अपघात झाला. यात ८ जणांनी जीव गमावला, तर काही जण गंभीर जखमी झाले. यापूर्वीही येथे अनेक अपघातांच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे नवले पुलावरून वाहन चालवणे जीवघेणे ठरत आहे.
बंगळुरू-मुंबई बाह्यवळण महामार्गावरील वाहतुकीसाठी धोकादायक ठरणाऱ्या कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल, वडगाव पुलाच्या आसपास मोठ्या प्रमाणावर नागरिकरण झाल्यानंतर हा मार्ग आता जीवघेणा ठरत आहे. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते. हा महामार्ग २४ तास व्यग्र असतो. बरोबर तीन वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्यातच अशी दुर्दैवी घटना घडली होती, त्यामध्ये तब्बल ४७ गाड्यांचं नुकसान झाले होते, तेव्हा पासून नवले पुलावर अपघाताची मालिका सुरूच आहे. नवले पुलावर आतापर्यंत अनेक अपघात घडले आहेत. तरीही प्रशासन ढिम्म राहिले आहे. तात्पुरत्या उपाययोजना केल्या की बस. पण वेगाने येणाऱ्या गाड्या कोण थांबवणार? अपघातांची ही मालिका कधी थांबणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
शासनाची निष्क्रियता, अधिकाऱ्यांची बेपर्वाई आणि योजनेतील तांत्रिक चुका यामुळे हा रस्ता आजही असुरक्षितच आहे. उताऱ्यामुळे वाहनांचा वेग आपोआप वाढतो. याचा फटका नागरिकांना बसत असून कोट्यवधी रुपयांचा दंड या एकाच ठिकाणी नागरिकांवर बसवला गेला आहे, असे डॉ. संभाजी मांगडे यांनी सांगितले.
नागरिकांनी उपस्थित केलेले प्रश्न
१) इतका तीव्र उतार सुरुवातीलाच का ठेवला? कमी का करता आला नाही?
२) रस्ता डिझाईन करताना योग्य तपासणी झाली का?
३) इंजिनिअरिंग विभागाने हा उतार सुरक्षित आहे का, याचे मूल्यमापन केले का?
४) नागरिकांच्या जीवापेक्षा रस्ता लवकर उघडणे का महत्त्वाचे ठरले?
५) चुकीच्या रचनांची जबाबदारी कोण घेणार?
उपाय काय आहेत?
• उताराचे पुनर्निर्माण किंवा ग्रेड कमी करणे.
• वेगमर्यादा वास्तव परिस्थितीनुसार बदलणे.
• ब्रेकिंग झोन व रंबल स्ट्रिप्स बसवणे.
• चेतावणी फलक वाढवणे.
• चुकीचे दंड रद्द करणे व पुनर्पडताळणी करणे.
रिंग रोड वेळेत झाला असता तरी जीव वाचले असते. दहा वर्षांत प्रस्तावित दोनपैकी एक जरी रिंग रोड झाला असता तरी अनेकांचे जीव वाचले असते. वाहतूककोंडी आणि लांबलचक रांगांमुळे जनजीवन अक्षरशः उद्ध्वस्त झाले असताना. या मार्गावर यमराजाने मुक्कामच ठोकला आहे की काय? अशी स्थिती आहे. पीएमआरडीए व एमएसआरडीसीचे रिंग रोड होणार या घोषणा ऐकत पंधरा वर्षे वाया गेली. तरीही सरकारांचा निगरगट्टपणा तसूभरही ढळला नाही. - ॲड. संतोष बाठे