हर हर महादेव! श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावणी सोमवारी लाखो भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:25 IST2025-07-28T15:24:40+5:302025-07-28T15:25:03+5:30
पहिल्याच श्रावण सोमवारी लाखो भाविकांनी हर हर महादेव, जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय अशा घोषणा देत मुसळधार पाऊस व दाट धुक्यामध्ये पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले.

हर हर महादेव! श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावणी सोमवारी लाखो भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन
भीमाशंकर: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्याच श्रावण सोमवारी सुमारे पावणे दोन लाख भाविकांनी हर हर महादेव, जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय अशा घोषणा देत मुसळधार पाऊस व दाट धुक्यामध्ये पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी शिवलिंगावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. दरवर्षी संपुर्ण श्रावण महिन्यामध्ये पविञ शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक भक्त येत असतात. गेल्या आठ ते दहा दिवसांपासुन या भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे निसर्ग सौंदर्य फुलले असून जिकडे तिकडे धबधबे हे खळखळुन वाहत आहेत. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी व पविञ अशा शिवलिंगाचे दर्शन असा दुहेरी योग जुळून आला. त्यामध्येच श्रावण महिन्याचा पहिला सोमवार त्या अगोदर दोन दिवस सुट्ट्या आल्यामुळे श्री क्षेञ भीमाशंकर येथे प्रचंड गर्दी पहावयास मिळाली. रविवारची सुट्टी लागून असल्यामुळे ह्या दिवसांमध्ये गर्दीचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला या तीन दिवसांमध्ये सुमारे चार ते पाच लाख भाविकांनी पविञ अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले.
वाहनतळ ते भीमाशंकर मंदिर परिसरात खेड उपविभागीय पोलीस विभाग यांच्या अंतर्गत घोडेगाव व खेड पोलीस ठाण्यांबरोबरच जिल्ह्यातून पुरेसा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. यामध्ये एक उपविभागिय पोलिस अधिकारी, एक पोलिस निरिक्षक, एकविस सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलिस उपनिरिक्षक अधिकारी तसेच १६० पुरुष पोलीस अमंलदार व ४० महिला पोलिस अमंलदार, एक आर. सी. पी. पथक, ७४ होमगार्ड,तसेच श्वान पथक असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आळंदी येथील स्वकाम सेवा संघ यांच्या वतीने मंदिर परिसर दर्शनबारी पायरी मार्ग या ठिकाणी स्वच्छता करण्यात येत होती. अमरनाथ सेवा संघ मंचर यांच्या वतीने ठिक ठिकाणी मोफत फराळ वाटप करण्यात येत होता. घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार्कींग नं एक ते पाच व बस स्थानक परिसरामध्ये सुसज्ज असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोहित कम्बोज भारतीया फांउंडेशन संचलित शिवसेवा संकल्प फाउंडेशन यांच्या वतीने वैद्यकिय सुविधा सुरक्षा गार्ड पुरविण्यात आली.