मेट्रो प्रकल्पांच्या विस्तारीकरणाच्या कामाला हिरवा कंदील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

By नितीन चौधरी | Published: January 4, 2024 06:58 PM2024-01-04T18:58:58+5:302024-01-04T18:59:43+5:30

स्वारगेट ते कात्रज तसेच पिंपरी ते निगडी या मार्गाबाबत महामेट्रो, राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील त्रिपक्षीय करार तातडीने पूर्ण करावा

Green Lantern, Deputy Chief Minister Ajit Pawar reviewed the expansion work of metro projects | मेट्रो प्रकल्पांच्या विस्तारीकरणाच्या कामाला हिरवा कंदील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

मेट्रो प्रकल्पांच्या विस्तारीकरणाच्या कामाला हिरवा कंदील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

पुणे: शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या विस्तारीकरणाच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा कंदील दिला आहे. या कामांना गती देऊन ती वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देत स्वारगेट ते कात्रज तसेच पिंपरी ते निगडी या मार्गाबाबत महामेट्रो, राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील त्रिपक्षीय करार तातडीने पूर्ण करावा, स्वारगेट ते लोणी काळभोर, हडपसर ते खराडी व रामवाडी ते वाघोली या मार्गांच्या तांत्रिक अहवालासाठी तातडीने सल्लागार नेमावेत अशा सुचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. रुबी हॉल ते रामवाडी या मार्गातील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात, ‘उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षा’ची बैठक झाली. या वेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पवार यांनी पुणे व पिंपरी शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला हिरवा कंदील दिला आहे. स्वारगेट ते कात्रज तसेच पिंपरी ते निगडी या मार्गाच्या विस्तारीकरणासाठी महामेट्रो, राज्य आणि केंद्र सरकार यांच्यामधील त्रिपक्षीय करार तातडीने पूर्ण करावा अशा सुचना दिल्या. वनाज ते रामवाडी या मार्गातील रुबी हॉल ते रामवाडी या टप्प्याची प्राथमिक चाचणी पूर्ण झाली असली तरी या मार्गातील २ ते ३ खांब वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. त्यासाठी हे खांब योग्य त्या ठिकाणी पुन्हा उभारावे लागतील असे सांगून त्यासाठी अतिरिक्त जमीन लागणार असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. त्यावर पवार यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करून मार्ग लवकरात लवकर खुला करावा अशा सुचना दिल्या. त्यामुळे या टप्प्यासाठी नव्याने भूसंपादन करावे लागणार असून हा मार्ग खुला होण्यास आणखी विलंब लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

स्वारगेट ते लोणीकाळभोर, हडपसर ते खराडी तसेच रामवाडी ते वाघोली या मेट्रो विस्तारित मार्गांचा तांत्रिक अहवाल तातडीने तयार करून राज्य सरकारला सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे मेट्रोच्या विस्तारीकरणाला यामुळे गती येणार असल्याचे बोलले जाते आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गासाठी राजभवन येथील मार्गावर पादचाऱ्यांसाठी उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. याठिकाणी राजभवन परिसराची सुरक्षितता लक्षात घेऊन स्टील आणि सिमेंट यांचा वापर करून सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मागणीनुसार प्रकल्पाच्या कामात काही ठिकाणी सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणांनुसार मेट्रो प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्प किंमतीस केंद्रीय नगरविकास विभागाची मान्यता आवश्यक आहे. याबाबत केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून याबाबतच्या अडचणी सोडविण्यात येतील, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Green Lantern, Deputy Chief Minister Ajit Pawar reviewed the expansion work of metro projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.