FYJC Admission: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; राज्यातील काेणतेही कॉलेज घरबसल्या निवडता येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 10:42 IST2025-05-09T10:41:57+5:302025-05-09T10:42:52+5:30
FYJC 11th Std Admission Online: राज्यभरातील गुणवंत विद्यार्थी पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आदी शहरांमधील नामांकित महाविद्यालयांसाठी अर्ज करण्याची शक्यता

FYJC Admission: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; राज्यातील काेणतेही कॉलेज घरबसल्या निवडता येणार
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर करून चार दिवस झाले असून, आता सर्वांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले आहे. दुसरीकडे गुरुवार पासून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने (कॅप) प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शिवाय राज्यभरातील विद्यार्थ्यांना ते राहत असतील त्या जिल्ह्यातून राज्यभरातील कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेता येणार आहे.
विशेष म्हणजे, एकावेळी एकच प्रवेश अर्जाद्वारे शाखा निवडता येईल. यात कोणत्याही एका शाखेसाठी अर्ज करता येणार असून, प्रत्येक फेरीच्या वेळी शाखा बदल करण्याची मुभा आहे. प्रवेश देताना दहावीच्या गुणांचाच आधार घेतला जाणार असून, उच्चतम ५ विषयांचे गुण यात विचारात घेतले जाणार आहेत. समान गुणवत्तेचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार असल्यास जन्मदिनांकानुसार ज्येष्ठतम विद्यार्थ्याच्या प्रवेशास प्राधान्य देण्यात येईल. या दोन स्तरांवरही (गुण व जन्मदिनांक) समान असल्यास विद्यार्थी, पालक, आडनाव इंग्रजीत घेऊन वर्णाक्षरांच्या क्रमाने ज्येष्ठतेनुसार प्रवेश करण्यात येतील.
...तर ग्रामीण महाविद्यालये पडतील ओस
उच्च शिक्षणासाठीविद्यार्थी माेठ्या संख्येने शहरात येतात. अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, शेतीशास्त्र, व्यवस्थापन, विधि, शिक्षणशास्त्र अशा अभ्यासक्रमांची निवड करतात. आता तर केंद्रीय पद्धतीने प्रक्रिया पार पडणार असल्याने शहरातील कॉलेजांत गर्दी वाढण्याची शक्यता आहे. राज्यभरातील गुणवंत विद्यार्थी पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आदी शहरांमधील नामांकित महाविद्यालयांसाठी अर्ज करतील आणि ग्रामीण महाविद्यालये ओस पडतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. काही नामांकित महाविद्यालयांमध्ये ‘कटऑफ’ गुण ९९ टक्के राहण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत स्थानिक गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार आहे.