घायवळ बंधूंच्या अडचणी वाढल्या; निलेश घायवळचा सख्खा भाऊ सचिनवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 19:13 IST2025-10-10T19:12:09+5:302025-10-10T19:13:36+5:30
कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी आता सचिन घायवळ वर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

घायवळ बंधूंच्या अडचणी वाढल्या; निलेश घायवळचा सख्खा भाऊ सचिनवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल
पुणे : कोथरूड भागात दहशत पसरवणाऱ्या कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीवर पुणेपोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोळीबार आणि कोयत्याने हल्ल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात टोळीचा सूत्रधार निलेश घायवळ यालाही आरोपी करण्यात आले आहे. त्यानंतर निलेश घायवळचे अनेक कारनामे सोमोर येऊ लागले आहेत. फसवणूक करून मिळवलेला पासपोर्ट, शस्त्र परवाना याबाबतीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. घायवळच काही राजकीय कनेक्शन आहे का? असे सवाल आता उपस्थित होऊ लागले आहेत. अशातच निलेश घायवळचा सख्खा भाऊ सचिनवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात घायवळ बंधूंच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. सचिन घायवळवर मोक्का दाखल करण्यात आला आहे. सचिन हा निलेश घायवळ चा सख्खा भाऊ आहे. कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी आता सचिन घायवळ वर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड पोलिस ठाण्यात निलेश घायवळ, सचिन घायवळ यासह इतर आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही - अजित पवार
नीलेश घायवळ प्रकरणात मी स्वतः पोलीस आयुक्तांना सांगितलं आहे की, कुणीही असो, कुठल्याही पक्षाचा असो, जर त्याने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला किंवा नियमांचे उल्लंघन केले, तर त्याच्यावर कारवाई करा. सचिन घायवळ यांच्या बंदुकीच्या परवान्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिफारस केली होती. मात्र तरीही त्यांना परवाना दिलेला नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्याला सांगितल्याचं अजित पवार म्हणाले. पुणे असो किंवा इतर कुठेही असो, कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असते, आणि मी त्यात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नसल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे.