पक्षाचे मतभेद विसरून उमेदवाराच्या मागे एकजुटीने उभे राहा; वळसे पाटलांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 11:22 IST2025-10-03T11:22:49+5:302025-10-03T11:22:49+5:30
गावातील गट-तट विसरून पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आतापासूनच घरोघरी जाऊन पक्षाने केलेली कामे सांगावीत

पक्षाचे मतभेद विसरून उमेदवाराच्या मागे एकजुटीने उभे राहा; वळसे पाटलांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन
अवसरी : अवसरी जिल्हा परिषद गट हा प्रतिष्ठेचा आहे. कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी एकजुटीने काम करावे, असे आवाहन माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले. अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील यशोदीप गार्डन मंगल कार्यालयात आयोजित पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात, साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक शांताराम बापू हिंगे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला सरचिटणीस रेवती ताई वाडेकर, सरपंच सारिका हिंगे, उपसरपंच अनिल हिंगे यांच्यासह पक्षाचे आजी-माजी कार्यकर्ते उपस्थित होते.
दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, अवसरी बुद्रुक गावातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, बहुतांश कामे मार्गी लागली आहेत. तरीही मतदानात मागे राहण्याचे कारण काय, याचे आत्मचिंतन कार्यकर्त्यांनी करावे. गावातील गट-तट विसरून पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आतापासूनच घरोघरी जाऊन पक्षाने केलेली कामे सांगावीत. जिल्हा परिषदेत पक्षाचा उमेदवार निवडून गेल्यास अवसरीला निधीची कमतरता भासणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, कार्यकर्त्यांच्या अडचणी असल्यास थेट भेटण्याचे आवाहन करताना मध्यस्थाची गरज नाही, असेही ते म्हणाले. याशिवाय, गावच्या नेतृत्वाने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांना मान-सन्मान द्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे यांनी गेल्या तीस वर्षांत दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून झालेल्या कामांचा आढावा घेतला. यापुढे सर्वांना सोबत घेऊन एकजुटीने काम करू, असे आश्वासन त्यांनी दिले.