जुन्नरमध्ये अन्नातून विषबाधा; जेवणाच्या भांड्यात मेलेली पाल आढळल्यानंतर ३० मजुरांची प्रकृती बिघडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 17:02 IST2026-04-24T17:02:26+5:302026-04-24T17:02:43+5:30
- सर्व मजूर बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराधीन

जुन्नरमध्ये अन्नातून विषबाधा; जेवणाच्या भांड्यात मेलेली पाल आढळल्यानंतर ३० मजुरांची प्रकृती बिघडली
वडगाव आनंद (पुणे जि. ) :पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मंगरूळ येथे शुक्रवारी अन्नातून विषबाधेची गंभीर घटना उघडकीस आली. कांदा काढणीसाठी वाशिम जिल्ह्यातून आलेल्या सुमारे ३० ते ३५ मजुरांना जेवणानंतर अचानक त्रास सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे.
अधिकच्या माहितीनुसार, सध्या परिसरात कांदा काढणीचा हंगाम सुरू असून मोठ्या संख्येने परराज्यातील मजूर येथे दाखल झाले आहे. शुक्रवारी दुपारी सर्व मजूर जेवण करत असताना एका भांड्यात मेलेली पाल आढळून आली. ही बाब लक्षात येताच मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जेवणानंतर काही वेळातच अनेक मजुरांना मळमळ, चक्कर आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागला. परिस्थितीची गंभीरता ओळखून सर्व बाधितांना तातडीने बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यामध्ये महिला, पुरुष तसेच लहान मुलांचाही समावेश आहे.
आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथकाने तात्काळ उपचार सुरू केले असून, सर्व मजुरांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही रुग्णांना पुढील उपचारासाठी नारायणगाव किंवा मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील मजुरांच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः हंगामी कामांसाठी येणाऱ्या मजुरांच्या राहणीमान आणि जेवणाच्या स्वच्छतेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.