कोंढव्यामध्ये इमारतीत आग; लाखोंचे नुकसान, सुदैवाने जखमी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:08 IST2025-01-13T18:08:15+5:302025-01-13T18:08:28+5:30
दुचाकीने पेट घेतल्यामुळे इमारतीत पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या घरगुती वस्तूंमुळे आग पसरली होती

कोंढव्यामध्ये इमारतीत आग; लाखोंचे नुकसान, सुदैवाने जखमी नाही
पुणे : इमारतीतील दुचाकीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी (दि. १३) पहाटे सव्वातीनच्या सुमारास कोंढवा खुर्दमधील एनआयबीएम रोड, नताशा एन्क्लेव्ह या चार मजली इमारतीत घडली. दुचाकीने पेट घेतल्यामुळे इमारतीत पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या घरगुती वस्तूंमुळे आग पसरली होती. मात्र, अग्निशमक दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नाही.
अग्निशमक दलाच्या जवानांनी इमारतीत कोणी रहिवासी अडकले नसल्याची खात्री केली. आगीवर पाण्याचा मारा करत १० ते १५ मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. जवानांच्या सतर्कतेमुळे आग कुठल्याही घरात न पसरल्याने जीवितहानी झाली नाही. इमारतीत एका घरामधून लिकेज असणारा सिलिंडर जवानांनी वेळीच बाहेर काढल्याने अनर्थ टळला. तळमजल्यावर असणारे सलूनचे दुकानही सुरक्षित राहिले असून, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. या कामगिरीत कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्र येथील प्रभारी अधिकारी कैलास शिंदे, वाहन चालक दीपक कचरे, तसेच तांडेल, नीलेश लोणकर, जवान मोहन सणस, सागर नेवगे, अनुराग पाटील आणि रामराज बागल यांनी सहभाग घेतला.