‘आरएसएस’च्या द्वेषाविरुद्ध प्रेमाचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:02 IST2021-02-05T05:02:02+5:302021-02-05T05:02:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “जातीवाद, धर्माची सर्कस अजून संपलेली नाही. जातीधर्माच्या दहशतीखाली सत्ता गाजवली जात आहे. एका संकुचित ...

The fight of love against the hatred of ‘RSS’ | ‘आरएसएस’च्या द्वेषाविरुद्ध प्रेमाचा लढा

‘आरएसएस’च्या द्वेषाविरुद्ध प्रेमाचा लढा

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “जातीवाद, धर्माची सर्कस अजून संपलेली नाही. जातीधर्माच्या दहशतीखाली सत्ता गाजवली जात आहे. एका संकुचित विचारसरणीत अडकवून ठेवले जात आहे. याविरोधात एकजुटीने लढा उभारावा लागेल. ही अस्तित्वाची लढाई आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) विरुद्ध सत्यशोधक रेझिस्टन्स (एसएसआर) अर्थात द्वेष विरुद्ध प्रेमाची लढाई उभी करावी लागेल,” असे आवाहन आंतरराष्ट्रीय लेखिका अरुंधती रॉय यांनी शनिवारी (दि. ३०) केले.

ब्राह्मण्यवाद, भांडवलशाही आणि पितृसत्ताक व्यवस्थेच्या विरोधात ‘एल्गार’ करण्याची गरज रॉय त्यांनी अधोरेखित केली. भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियानातर्फे आयोजित ‘एल्गार परिषदे’त त्या बोलत होत्या. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, माजी पोलिस अधिकारी एस. एम. मुश्रीफ आदी यावेळी उपस्थित होते.

रॉय म्हणाल्या, “पेशवाई गेली, मात्र ब्राह्मण्यवाद गेला नाही. एकविसाव्या शतकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्राह्मण्यवादाचे नेतृत्व करतो. मोदींच्या रुपात हे नेतृत्व दिल्लीच्या सत्तेवर बसले आहे. मोदी काँग्रेसच्या वंशवादावर बोलताना दमत नाहीत, मात्र अंबानी, अदानी यांच्यासारख्या कॉर्पोरेट क्षेत्रातील घराणेशाहीला सढळ मदत करतात, हा विरोधाभास आहे. भांडवलशाहीमुळे देशात विषमता वाढीस लागली आहे. कोरोना काळात कोट्यवधी लोकांनी रोजगार गमावला, याच वेळी भारतातील श्रीमंतांची संपत्ती वाढत होती. कॉर्पोरेट वर्गाकडे सर्व सुविधा एकवटल्या आहेत.”

चौकट

अरुंधती रॉय म्हणाल्य

-दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. कृषी विधेयके तातडीने मागे घेतली जावीत.

-आपल्याकडे राजकीय विचार, जात, धर्म यावर शिक्षा ठरवली जाते. भडकाऊ विधान करणारे लोक, टीव्ही अँकर खुलेआम फिरत आहेत आणि वकील, विचारवंत यांना तुरुंगात डांबले जात आहे. कोरेगाव भीमा प्रकरणी अटक केलेल्या सर्वाना त्वरीत मुक्त केले जावे.

-संसद ‘त्यांच्या’ हातात आहे, ज्यांचे गोमूत्र हे आवडीचे औषध आहे. सत्ताधारी भारताला हजारो वर्षे मागे नेत आहे. इतिहास मिथकात आणि मिथक इतिहासात बदलले जात आहे.

-भाजपा हिंदू राष्ट्रवादाच्या नावाखाली देशावर मालकी हक्क गाजवू पाहत आहेत.

Web Title: The fight of love against the hatred of ‘RSS’