भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी दुहेरी संकटात; रोगाचा प्रादुर्भाव आणि पावसामुळे भात शेती खराब
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 12:37 IST2025-10-23T12:37:13+5:302025-10-23T12:37:30+5:30
भोर तालुक्यात सुमारे ७५०० भाताची लागवड केली जात असून त्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात इंद्रायणी भाताची लागवड केली जाते.

भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी दुहेरी संकटात; रोगाचा प्रादुर्भाव आणि पावसामुळे भात शेती खराब
भोर : भात पिकावर पडलेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात भात पीक खराब झाले होते. उरलेसुरले भात काढत असताना पडलेल्या अवकाळी पावसामुळे भात पीक पाण्यात भिजवून गेल्याने भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
भोर तालुक्यात सुमारे ७५०० भाताची लागवड केली जाते. त्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात इंद्रायणी भाताची लागवड केली जाते. पश्चिम भागाला भाताचे आगार समजले जाते. तालुक्यातील व पश्चिम भागातील भात हे प्रमुख पीक आहे. मात्र भात पोषण्याच्या अवस्थेत असताना रोगाच्या प्रादुर्भावा मुळे भात पीक मोठ्या प्रमाणावर खराब झाले होते. उरलेले पीक काढत असताना अचानक अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे भात पाण्यात भिजून खराब झाले. मुसळधार पावसामुळे भाताच्या ओंब्या झडून गेल्या फक्त पेंडा शिल्लक राहिला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीक खराब झाल्याने काढलेच नाही. मजुरीचा खर्च निघत नसल्यामुळे तसेच सोडून दिले. तालुक्याच्या पश्चिम भागातील हिर्डोशी खोरे, महूडे खोरे वेळवंड खोरे, भूतोंडे खोरे या भागातील भात हे एकमेव पीक असून या पिकावरच येथील शेतकऱ्यांचा वर्षभराचा उदरनिर्वाह भागवला जातो. मात्र रोगाचा प्रादुर्भाव आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून भात पिकाची नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील शेतकरी करीत आहेत. भात हे आमच्या उदरनिर्वाच साधन असून भात पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नातून वर्षभर शेतकरी कुटुंब चालत असतात. मात्र रोग आणि पाऊस यामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बियाणाचा आणि मजुरीचा खर्च निघत नाही अशी अवस्था झाली असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.