पिंपरीच्या पिंपळे गुरवमध्ये सिलिंडर गॅसचा स्फोट; दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 14:08 IST2021-12-08T14:07:44+5:302021-12-08T14:08:20+5:30
पिंपळे गुरव येथील मोरया पार्कमधील एका खोलीत घरगुती वापराच्या सिलिंडरमधून व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये गॅस भरण्यात येत होता

पिंपरीच्या पिंपळे गुरवमध्ये सिलिंडर गॅसचा स्फोट; दोघे गंभीर जखमी
पिंपरी : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरमध्ये गॅस भरत असताना स्फोट झाला. यात दोन जण गंभीर जखमी झाले. पिंपळे गुरव येथील ६० फुटी रोडवरील मोरया पार्क लेन - ५ येथे बुधवारी (दि. ८) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील मोरया पार्कमधील एका खोलीत घरगुती वापराच्या सिलिंडरमधून व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये गॅस भरण्यात येत होता. त्यावेळी गॅस गळती होऊन स्फोट झाला. यात खोलीचा दरवाजा तुटून खोलीबाहेरील टेम्पोचेही नुकसान झाले. तसेच यात दोन जणांना दुखापत होऊन गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
स्फोट झाला त्यावेळी खोलीत घरगुती वापराचे १० तर व्यावसायिक वापराचे पाच सिलिंडर होते. या सिलिंडमधून गॅस असुरक्षितपणे काढून व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये भरण्यात येत होता. पोलिसांकडून अशा प्रकारांचा पर्दाफाश करण्यात येत असून, गुन्हे दाखल केले जात आहेत. तरीही असे प्रकार सुरूच असल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.