वृद्ध आणि सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी गर्दी टाळावी; कोरोनाबाबत अजित पवारांच्या सूचना

By नितीन चौधरी | Updated: June 14, 2025 19:33 IST2025-06-14T19:33:15+5:302025-06-14T19:33:55+5:30

कोविडचे सौम्य स्वरूप लक्षात घेता नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन अजित पवारांनी केले आहे

Elderly and people with co-morbidities should avoid crowds; Ajit Pawar's advice regarding Corona | वृद्ध आणि सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी गर्दी टाळावी; कोरोनाबाबत अजित पवारांच्या सूचना

वृद्ध आणि सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी गर्दी टाळावी; कोरोनाबाबत अजित पवारांच्या सूचना

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागातील कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज विधानभवन येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कोविडचे सौम्य स्वरूप लक्षात घेता नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. विशेषतः वृद्ध आणि सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी गर्दी टाळावी, मास्क वापरावा आणि हात स्वच्छ ठेवावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, तसेच कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्ह्यांतील आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून, सर्व सरकारी रुग्णालयांनी संभाव्य साथीला सामोरे जाण्यास सज्ज राहावे, असे आदेश दिले. तसेच येणाऱ्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरही आरोग्य यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.या बैठकीत डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी व इतर संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोविडच्या नवीन उपप्रकारांवर लक्ष

बैठकीत डॉ. विजय कंदेवाड यांनी सादरीकरण करताना सांगितले की, सध्याच्या तपासणीत ओमीक्रॉनचे जेएन, एक्सएफजी व जीएफ ७-९ हे उपप्रकार आढळून येत आहेत. या प्रकारांमुळे ताप, खोकला, घसा दुखणे यासारखी सौम्य लक्षणे दिसून येतात. मात्र, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे किंवा ज्यांना मधुमेह, कर्करोग अशा गंभीर सहव्याधी आहेत, अशा व्यक्तींना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

नागरिकांना आवाहन 

 सौम्य लक्षणे असली तरी दुर्लक्ष करू नका, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. मास्कचा वापर करा, हात स्वच्छ ठेवा श्वसनदाह वाढल्यास तात्काळ तपासणी करा.

Web Title: Elderly and people with co-morbidities should avoid crowds; Ajit Pawar's advice regarding Corona