मद्यधुंद कंटेनर चालकाचा पराक्रम; ४ वाहनांना धडक देत थेट दुकानात शिरला, एका महिलेचा मृत्यू, ५ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 17:52 IST2025-12-10T17:51:25+5:302025-12-10T17:52:30+5:30
पुणे नगर महामार्गावर एका मद्यधुंद कंटेनर चालकाने पिकअप, कार आणि दोन दुचाकींना धडक देत एका निष्पाप महिलेचाही बळी घेतला

मद्यधुंद कंटेनर चालकाचा पराक्रम; ४ वाहनांना धडक देत थेट दुकानात शिरला, एका महिलेचा मृत्यू, ५ जण जखमी
रांजणगाव गणपती: पुणे नगर महामार्गावर कासारी फाटा (ता.शिरूर) येथे मद्यधुंद कंटेनर चालकाने पिकअपला धडक दिल्याने पिकअप उलटून कंटेनरची दोन चारचाकी वाहनांसह दोन दुचाकी आणि एका दुकानाला धडक दिली आहे. अपघातात एका महिलेचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले आहेत. या अपघात प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सरफराज बशीरभाई नरसलिया या कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघाता बाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे नगर महामार्गावरुन तेजस पंदरकर व मयूर पंदरकर हे दोघे दि.९ रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील पिकअप घेऊन पुणेच्या दिशेने चालले होते. त्यावेळी त्यांच्या मागून नगर बाजूकडून मद्यधुंद अवस्थेत आलेल्या कंटेनर चालकाची पंदरकर यांच्या पिकअपला जोरदार धडक बसून ती रस्त्यावर उलटली. याच वेळी कंटेनरची कारला धडक बसून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चंद्रकला मुळे या महिलेसह दोन दुचाकीना धडक बसली. त्यानंतर हा कंटेनर समोरील चहाच्या दुकानात शिरला. दरम्यान नागरिकांनी कार सह पिकअप मधील नागरिकांना तातडीने बाहेर काढत उपचारासाठी दाखल केले.
सदर अपघातात पिकअप मधील तेजस विलास पंदरकर व मयूर विलास पंदरकर दोघे रा. पिंपळगाव पिसा ता.श्रीगोंदा जि. अहिल्यानगर यांसह कार मधील जयवंत रानुजी भाकरे, विजया जयवंत भाकरे, रामदास देवराम भाकरे सर्व रा. माळवाडी टाकळी हाजी ता.शिरुर जि. पुणे हे जखमी झाले असून या अपघातात चंद्रकला संदीप मुळे (वय ६५ वर्षे)रा. केज जि. बीड या महिलेचा मृत्यू झाला आहे .याबाबत पिकअप चालक तेजस विलास पंदरकर (वय २५ वर्षे) रा. पिंपळगाव पिसा यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी सरफराज बशीरभाई नरसलिया (वय ३८ वर्षे) रा. भागवतीबरा ता,जि. राजकोट गुजरात या कंटेनर चालकावर गुन्हा केला असून पुढील तपास पोलीस हवालदार रफिक शेख हे करत आहे.