आजारी कोंबड्या आणू नका! पोल्ट्री कामगार आणि कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्याचा वाद, चालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 18:23 IST2025-07-07T18:23:13+5:302025-07-07T18:23:21+5:30

लंगड्या व आजारी कोंबड्या गाडीत भरण्यासाठी आणू नका. दुकानदार तसल्या कोंबड्या घेत नाहीत, असे चालकाने पोल्ट्री कामगारांना सांगितले होते

Don't bring sick chickens! Argument between poultry workers and chicken transporter, driver dies | आजारी कोंबड्या आणू नका! पोल्ट्री कामगार आणि कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्याचा वाद, चालकाचा मृत्यू

आजारी कोंबड्या आणू नका! पोल्ट्री कामगार आणि कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्याचा वाद, चालकाचा मृत्यू

इंदापूर : लंगड्या व आजारी कोंबड्या का घेत नाही या कारणावरुन वादविवाद करत पोल्ट्रीतील कोंबड्या भरणाऱ्या चौघा कामगारांनी बेदम मारहाण केल्याने, कोंबड्यांची वाहतूक करणा-या वाहनावरील चालकाचा मृत्यू झाला. गलांडवाडी नं.१ येथे ही घटना घडली. त्या चौघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
    
निखील जाधव, विकी नलावडे (दोघे रा.गलांडवाडी नं.१, ता.इंदापूर) लहु शिंदे, विशाल कांबळे (दोघे रा. शिरसोडी, ता.इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. रियाज चुन्नुमियाँ जागिरदार (वय ५२ वर्षे,रा. रा. सय्यदनगर,हडपसर ता.हवेली, जि.पुणे) असे मरण पावलेल्या इसमाचे नाव आहे. त्याचा मेव्हणा आसिफ यूनुस शेख ( रा.सय्यदनगर,नूर मस्जिदजवळ, हडपसर ता.हवेली जि.पुणे) यांनी चौघा आरोपींविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.
    
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  जागिरदार व फिर्यादी आसिफ शेख हे प्रिमियम चिक्स लि.या कंपनीकडे कोंबड्या वाहतूक करणाऱ्या जमीर इक्बाल शेख यांचे मालकीच्या वाहनांवर चालक म्हणून काम करतात. कंपनी ज्या गावामध्ये कोंबड्या भरण्यासाठी जाण्यास सांगेल तेथे जाऊन कोंबड्या भरुन घेवून कंपनीमध्ये आणणे हे त्यांचे काम आहे. दि.५ जुलै रोजी रियाज जागिरदार हे गलांडवाडी नं.१ येथील पोल्ट्रीचालक विशाल सूर्यवंशी यांच्याकडील कोंबड्या भरण्यासाठी गेले होते. रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास लंगड्या व आजारी कोंबड्या गाडीत भरण्यासाठी आणू नका. दुकानदार तसल्या कोंबड्या घेत नाहीत, असे जागिरदार कोंबड्या भरणाऱ्या चार आरोपींना म्हणाले. त्यावर तुम्ही लंगड्या व आजारी कोंबड्या का घेत नाही. तुमच्या बापाचे काय जाते. प्रवासात लंगड्या झाल्या असे सांगा असे आरोपी जागिरदार यांना म्हणाले. यावरुन वादविवाद झाला. त्या चौघांनी जागिरदार यांना डोक्यावर बेदम मारहाण केली. ते चक्कर येवून तेथेच बेशुध्द पडले. त्याच अवस्थेत त्यांना उपचारासाठी बारामती येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. तपासणी नंतर तेथील डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुण्याला घेऊन जाण्यास सांगितले. ससून हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यानंतर डोक्यात झालेल्या अंतर्गत रक्तस्त्रावामुळे दि.६ जुलै रोजी जागिरदार यांचा मृत्यू झाला. त्याच दिवशी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरुन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Don't bring sick chickens! Argument between poultry workers and chicken transporter, driver dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.