नम्रता फडणीस
पुणे : पुण्यात आर्थिक ताणतणावातून अधिकांश आत्महत्या झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कौटुंबिक हिंसाचार, लग्नास नकार देणे आणि कामाच्या ठिकाणचा मानसिक ताणतणाव ही देखील आत्महत्येमागची महत्त्वपूर्ण कारणे आहेत. यंदा नऊ महिन्यांत १३१ जणांनी (स्त्री व पुरुष) जीवनयात्रा संपवली असून, यात महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण अधिक आहे.
माणसाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. काही व्यक्तींमध्ये अपयश सहन करण्याची क्षमता असते. मात्र, काही व्यक्ती नैराश्यात जाऊन कुटुंबाचा विचार न करता आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलतात. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच आत्महत्येच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून, युवक, शेतकरी, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटांमध्ये ही समस्या आढळून येत आहे. ही एक मानसिक अवस्था आहे, जिथे माणूस आशा गमावतो आणि स्वतःच्या अस्तित्वाला अर्थहीन समजतो. माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी २०२२ पासून ते आतापर्यंत शहरात झालेल्या आत्महत्येची कारणासहित आकडेवारी मिळण्यासाठी माहिती अधिकाराअंतर्गत पोलिस आयुक्तालयात अर्ज केला होता. त्यामध्ये २०२२ ते १२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत एकूण (स्त्री व पुरुष) ७९० आत्महत्या झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच यंदा १२ सप्टेंबरपर्यंत आर्थिक भारातून ५३, घरगुती हिंसाचार २१, लग्नास नकार देणे ४, कामाच्या ठिकाणी ८ व इतर ४५ अशा एकूण १३१ जणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
महिलांबाबतच्या गुन्ह्याची कितीतरी प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. अद्यापही फास्ट ट्रॅक कोर्ट झालेली नाहीत. ही कोर्ट झाली तर महिलांना लवकरात लवकर न्याय मिळेल. - विहार दुर्वे, माहिती अधिकार कार्यकर्ते
वर्ष -----------एकूण आत्महत्या ------स्त्री ----------------पुरुष
२०२२----------- २२९ -------------------६६ -------------- -१६३
२०२३ ------------२१५ -------------------५५ ---------------१६३
२०२४ -------------२१५ -------------------६९ ------------- -१४६
२०२५-------------१३१ --------------------४५------------------ ८६
एकूण ------------७९० ---------------------२३५ ---------------५५८