गुंतवणुकीच्या आमिषाने डाॅक्टरसह मित्राची दीड कोटीची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 19:13 IST2025-02-15T19:13:38+5:302025-02-15T19:13:47+5:30

जयपूरमधील डाॅक्टरने आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत मिळाली आहे

Doctor and friend cheated of Rs 1.5 crore under the lure of investment | गुंतवणुकीच्या आमिषाने डाॅक्टरसह मित्राची दीड कोटीची फसवणूक

गुंतवणुकीच्या आमिषाने डाॅक्टरसह मित्राची दीड कोटीची फसवणूक

पुणे: आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने शहरातील एका प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञासह मित्राची दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जयपूरमधील एका डाॅक्टरविरोधात चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जयपूरमधील डाॅक्टरने आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत मिळाली आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. मोहित मुकेश नागर (४१, रा. इंदिरा कॉलनी, बनी पार्क, जयपूर, राजस्थान) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे.

याबाबत एका ५४ वर्षीय डॉक्टरांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार प्रसिद्ध त्वचाविकारतज्ज्ञ आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जयपूरमधील एका डाॅक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती चतु:शृंगी पोलिसांनी दिली. तक्रारदार डाॅक्टरची आरोपी डाॅक्टरशी एका परिचितामार्फत २०१९ मध्ये जयपूरमध्ये ओळख झाली होती. कोरोना संसर्ग काळात आरोपी डाॅक्टरच्या नात्यातील एकाला कोरोना संसर्ग झाला होता. त्यावेळी पुण्यातील डाॅक्टरांनी आरोपी डाॅक्टरच्या परिचिताला मदत केली होती. ओळखीतून त्यांची आरोपीशी मैत्री झाली. डाॅ. नागरने त्यांना आभासी चलनात १० लाख रुपये गुंतविण्यास सांगितले. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखविण्यात आले होते.

त्यानंतर तक्रारदार डाॅक्टरच्या मित्राने एक कोटी ४९ लाख रुपयांची रक्कम त्याला गुंतवण्यास दिली. रक्कम गुंतवण्यात आल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही. त्यानंतर त्यांनी त्याच्याकडे पैसे परत मागितले. तेव्हा त्याने पैसे देण्यास नकार दिला तसेच जिवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारदार डाॅक्टरांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. चौकशीत आरोपी डाॅक्टरने अनेकांची फसवणूक केल्याची माहिती चौकशीत मिळाली. त्याने आणखी किती जणांची फसवणूक केली. यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

Web Title: Doctor and friend cheated of Rs 1.5 crore under the lure of investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.