दिवाळीच्या खरेदीची पुण्यात उत्साहाची लाट; मध्यवर्ती भागात प्रचंड गर्दी, दुकानांवर ग्राहकांची झुंबड उडाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 19:51 IST2025-10-11T19:49:51+5:302025-10-11T19:51:16+5:30
लक्ष्मी रोडवर लहान मुलांच्या कपड्यांच्या दुकानांवर तर अक्षरशः ग्राहकांची झुंबड उडाली आहे. या गर्दीतून पायी जाणाऱ्यांना मार्ग काढणेसुद्धा अवघड झाले

दिवाळीच्या खरेदीची पुण्यात उत्साहाची लाट; मध्यवर्ती भागात प्रचंड गर्दी, दुकानांवर ग्राहकांची झुंबड उडाली
पुणे : दिवाळीचा सण अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपल्याने पुणेकरांमध्ये खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. शनिवार आणि रविवारची जोडून आलेली सुटी ही नागरिकांसाठी खरेदीची पर्वणी ठरली आहे. शनिवारी शहराच्या मध्यवर्ती भागांत लक्ष्मी रोड, तुळशीबाग, कुमठेकर रोड, टिळक रोड, केरळ रोड, डेक्कन व कॅम्प परिसरात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. कपड्यांच्या दुकानांबाहेर सजवलेल्या पुतळ्यांना परिधान केलेली आकर्षक वस्त्रे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत होती. पारंपरिक पोशाखांपासून ते आधुनिक फॅशनपर्यंत विविध डिझाईन्समधील कपडे बाजारपेठेत उपलब्ध आहेत. विशेषतः लहान मुलांच्या कपड्यांमध्ये नवनवीन पॅटर्न आणि रंगसंगती पाहून पालकांनाही खरेदीची भुरळ पडली आहे. सकाळी दहा वाजल्यापासूनच खरेदीसाठी नागरिक बाहेर पडले. तळपत्या उन्हातही खरेदीचा उत्साहाचे चित्र दिसले. दुपारी एकच्या सुमारास गर्दी थोडी कमी झाली असली तरी संध्याकाळी चारनंतर पुन्हा मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ वाढली आणि रात्री अकरा वाजेपर्यंत बाजारपेठा गजबजलेल्या राहिल्या.
इंडो-वेस्टर्न ड्रेस, कुर्तीसह डिझाईन्सची क्रेझ असलेल्या साड्या
तरुणींमध्ये फॅशनेबल जीन्स, टॉप्स, इंडो-वेस्टर्न ड्रेस, कुर्ते आणि स्टायलिश गाऊनची विशेष मागणी दिसून येत आहे. नवीन पॅटर्न, कट्स आणि रंगांच्या विविधतेमुळे तरुणाई मोठ्या उत्साहाने खरेदी करत आहे, तर महिलांमध्ये टीव्ही मालिकांतील आणि चित्रपटांमधील अभिनेत्री वापरत असलेल्या साड्यांच्या डिझाईन्सची क्रेझ स्पष्टपणे जाणवते. सिल्क, जॉर्जेट, ऑर्गेन्झा, बनारसी आणि कांजीवरम साड्यांचे आकर्षक कलेक्शन खरेदीसाठी महिलांची मोठ्या संख्येने दुकानांकडे गर्दी आहे.
खरेदीपेक्षा वाहन पार्किंगसाठी अधिक वेळ
वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे पार्किंगची समस्या अधिकच तीव्र झाली. खरेदीपेक्षा वाहन उभे करण्यासाठी जागा शोधण्यात अनेकांना वेळ खर्च करावा लागला.
आकर्षक ऑफर्स, सवलती आणि लकी ड्रॉ योजनांची भुरळ
दरम्यान, व्यापाऱ्यांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स, सवलती आणि लकी ड्रॉ योजना जाहीर केल्या आहेत. अनेक कपड्यांच्या दुकानांत २५ ते ५० टक्क्यांपर्यंत सूट, ‘खरेदी करा आणि भेटवस्तू मिळवा’ अशा ऑफर्सचा वर्षाव होत आहे. या सवलतींमुळे महिलांसह तरुणाई आणि कुटुंबवत्सल नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
लक्ष्मी रोडवरील गर्दीत पायी चालणेही अवघड
लक्ष्मी रोडवरील पदपथ भागात लहान मुलांच्या कपड्यांच्या दुकानांवर तर अक्षरशः ग्राहकांची झुंबड उडाली आहे. या गर्दीतून पायी जाणाऱ्यांना मार्ग काढणेसुद्धा अवघड झाले. बाजारपेठेत वाढलेल्या गर्दीमुळे दुपारच्या वेळी परिसरातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्येही खचाखच गर्दी दिसली.
रविवारी गर्दीचा ओघ वाढणार
येत्या शुक्रवारपासून (दि. १७) वसुबारसेने दिवाळी सणाची सुरुवात होत आहे. त्यापूर्वीचा आजचा रविवार दिवाळीपूर्वीचा शेवटचा सुट्टीचा दिवस असल्याने नागरिकांची खरेदीसाठी गर्दी आणखी वाढणार आहे. व्यापारी वर्गाकडून कामगारांची संख्या वाढवून येणाऱ्या ग्राहकांना आवडीचे कपडे व वस्तू उपलब्ध होतील याची काळजी घेतली आहे. खरेदीसाठी येणाऱ्यांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक पोलिस आणि प्रशासनाकडून बाजार परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.