केंद्र सरकारचीही मदत लवकरात लवकर आपत्तीग्रस्तांना मिळेल; भाजप प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 16:04 IST2025-09-29T16:02:53+5:302025-09-29T16:04:07+5:30
आपत्तीग्रस्त शेतकरी व नागरिकांना मदत करणे गरजेचे असून आम्ही माय बाप सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे

केंद्र सरकारचीही मदत लवकरात लवकर आपत्तीग्रस्तांना मिळेल; भाजप प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला विश्वास
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार म्हणून जी मदत व्हायला हवी, ती देण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलली आहेत. केंद्र सरकारचीही मदत लवकरात लवकर आपत्तीग्रस्तांना मिळेल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधितांना मदतीचा हात देण्यासाठी शहर भाजपच्या वतीने संकलित केलेले धान्य व इतर वस्तू चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला. त्यामुळे काही जिल्ह्यांतील गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आपत्तीग्रस्त शेतकरी व नागरिकांना मदत करणे गरजेचे आहे. आम्ही माय बाप सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार म्हणून जी मदत व्हायला हवी, ती देण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलली आहेत. परंतु भाजप नेहमीच आपत्तीच्या वेळी मदतीचा हात देते. म्हणून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले होते. त्यानुसार भाजप पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने कार्यकर्त्यांनी धान्य व वस्तू जमा केल्या आहेत. जमा झालेले धान्य आणि वस्तू पक्षाकडून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना दिल्या जाणार आहेत. हे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुपुर्त केले जाईल. ते गरज असेल तिथे ती पोहचवतील, असेही चव्हाण म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा, रद्द करून पूरग्रस्तांना मदत करावी, अशी मागणी केली जात आहे. या प्रश्नावर चव्हाण यांनी काय करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे म्हणत बोलणे टाळले. दरम्यान, राज्यातील ओला दुष्काळ घोषित करावा का ? या प्रश्नावर मात्र, चव्हाण यांनी बोलणे टाळले आणि केवळ धन्यवाद म्हणत प्रश्नाला बगल दिली.