धर्मेंद्र यांची ‘बिर्याणी’ चाखण्याची इच्छा अपूर्ण राहिली; पुण्याशी जुळले होते ऋणानुबंध, सुभाष सणस यांची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 10:27 IST2025-11-25T10:26:25+5:302025-11-25T10:27:12+5:30
आमच्या घरी येण्यासाठी निमंत्रण दिलं की, कोणताही आडपडदा न ठेवता, नेहमीच्या प्रामाणिक हसऱ्या चेहऱ्यानं ते घरात पाऊल टाकायचे

धर्मेंद्र यांची ‘बिर्याणी’ चाखण्याची इच्छा अपूर्ण राहिली; पुण्याशी जुळले होते ऋणानुबंध, सुभाष सणस यांची आठवण
पुणे: गेल्या पंचवीस वर्षांपासून धर्मेंद्रजींबरोबर आमच्या कुटुंबाचं जणू काही नात्यापलीकडचं एक कोमल, भावनिक नातं तयार झालं होतं. दरवर्षी दिवाळी आली की, आमच्या घरातून त्यांना फराळ पाठवणं ही जणू परंपराच झाली होती. आमच्या घरी येण्यासाठी निमंत्रण दिलं की, कोणताही आडपडदा न ठेवता, नेहमीच्या प्रामाणिक हसऱ्या चेहऱ्यानं ते घरात पाऊल टाकायचे. पत्नीच्या हातची बिर्याणी खाल्ल्यानंतर ते ज्या प्रेमानं, ज्या समाधानानं हसले होते, ते दृश्य आजही डोळ्यांसमोर ताजं आहे. सहा महिन्यांपूर्वी लोणावळ्यातील त्यांच्या फार्महाउसवर भेटायला गेलो तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा तीच बिर्याणी चाखायची इच्छा व्यक्त केली होती; पण नियतीला कदाचित काही वेगळंच मान्य होतं. त्यांची ती निरागस इच्छा पूर्ण करण्याची संधी आमच्या हातून निसटून गेली असल्याची हदयस्पर्शी आठवण उद्योजक सुभाष सणस यांनी व्यक्त केली.
‘बसंती इन् कुत्तों के सामने मत नाच’ असे म्हणणारा ‘अँग्री मॅन’, ‘पल पल दिल के पास तुम रहती हो’ म्हणणारा रोमँटिक प्रियकर’, ‘मै जट यमला पगला दिवाना’ म्हणत अभिनेत्रीशी खट्याळपणे वागणारा नटखट हिरो आणि सहजसुंदर अभिनयातून विनोदी भूमिका तितक्याच ताकदीने पेलणारा हरहुन्नरी कलावंत या माध्यमातून पडद्यावर विविध रूपांत भेटणारे ‘हि-मॅन’ धर्मेंद्र यांचे पुण्याशी ऋणानुबंध जुळले होते. त्यांच्याविषयीच्या आठवणी सांगताना सणस काहीसे भावुक झाले होते.
ते म्हणाले, गाड्यांच्या शौकमधूनच धर्मेंद्र यांच्याशी ओळख झाली आणि नंतर ती ओळख मैत्रीत बदलली. त्यांना पुणे खूप आवडायचे. त्यांना कायम भेटायला जाताना पुरणपोळी, करंजी घेऊन जायचो. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्याशी भेट झाली होती. त्यांनी संपूर्ण फार्महाउस दाखविले. त्यांचे ‘जिद्दी’, ‘शोले’ हे चित्रपट माझे आवडते आहेत. २००७ मध्ये पाचव्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (पिफ)मध्ये धर्मेंद्र आणि अभिनेत्री आशा पारेख यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्या प्रसंगाच्या आठवणी ‘पिफ’चे चेअरमन डॉ. जब्बार पटेल यांनी शेअर केल्या. “त्या वेळी त्यांनी दिलेले भाषण उत्कृष्ट होते. इतका आनंदी आणि मिश्कील माणूस शोधूनही सापडणार नाही. ते उत्तम शायरदेखील होते. घरी भेटायला गेल्यावर त्यांनी अप्रतिम उर्दू शायरी ऐकवली होती,” असे पटेल यांनी सांगितले.
‘पिफ’चे जनसंपर्क अधिकारी प्रवीण वाळिंबे यांनीही धर्मेंद्र यांच्याशी झालेल्या भेटीची आठवण सांगितली. “पत्रकारांच्या वार्तालापापूर्वी त्यांनी माझा हात हातात घेऊन आस्थेने चौकशी केली. माझ्या खांद्यावर हात ठेवून ते प्रेमाने म्हणाले, आज सर्व वृत्तपत्रांत पुरस्कार जाहीर झाल्याच्या बातम्या वाचल्या. ‘यू आर अ गुड पी.आर.ओ.’ असे म्हणत पाठीवर थाप दिली. मी नम्रपणे ‘प्रसिद्धी तुमच्यामुळेच मिळाली’ म्हटल्यावर ते दिलखुलास हसून म्हणाले, ‘आप अच्छे पी.आर.ओ. हो... और अच्छे ऑनेस्ट इन्सान भी।’ हे शब्द आजही स्मरणात आहेत,” असे वाळिंबे म्हणाले.