डिझाइन केवळ आकार-सुशोभीकरण नाही, समाजावर सकारात्मक प्रभावाची प्रगल्भ विचार प्रणाली: प्रा. नाडकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 13:32 IST2026-05-18T13:29:15+5:302026-05-18T13:32:48+5:30

डिझाइन गुरु प्रा. सुधाकर नाडकर्णी यांच्या ‘बाय डिझाईन : वर्क अँड थॉटस’चे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन.

design not just about shape decoration it is a profound system of thought positive impact on society said prof sudhakar nadkarni at by design work and thoughts book publication | डिझाइन केवळ आकार-सुशोभीकरण नाही, समाजावर सकारात्मक प्रभावाची प्रगल्भ विचार प्रणाली: प्रा. नाडकर्णी

डिझाइन केवळ आकार-सुशोभीकरण नाही, समाजावर सकारात्मक प्रभावाची प्रगल्भ विचार प्रणाली: प्रा. नाडकर्णी

पुणे: भारतात डिझाईन आणि डिझाईन शिक्षणाची नवी प्रणाली रुजवणार्‍या  प्रा. सुधाकर नाडकर्णी यांच्या ‘बाय डिझाईन : वर्क अँड थॉटस ‘(By Design : Work and Thoughts)  या पुस्तकाचे अलीकडेच पुणे इंटर नॅशनल सेंटरच्या सभागृहात मोठ्या उत्साहात प्रकाशन करण्यात आले . या समारंभात प्रा. नाडकर्णी यांचे जेजे स्कूलमधले सहाध्यायी, माजी विद्यार्थ्यांमधील आघाडीचे डिझायनर्स, कुटुंबीय तसेच डिझाइनचे शिक्षण घेत असणारी तरुणाई अशा ‘डिझाईन घराण्या’च्या तीन पिढ्यांची उत्साही उपस्थिती बघायला मिळाली. वयाच्या ९३  व्या वर्षीही तितक्याच उत्साहाने कार्यरत असणार्‍या या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा हा गौरवसोहळा होता. 
 
या प्रसंगी बोलताना प्रा. कीर्ती त्रिवेदी यांनी इंडस्ट्रियल डिझाईन सेंटरची(IDC) स्थापना करून विद्यार्थी   कसे घडवले ते  उलगडत आपल्या गुरूला मानवंदना दिली. पारंपारिक तंत्रज्ञान-अभियांत्रिकी शिक्षण प्रणालीला छेद देत देशात डिझाईन शिक्षणाची नवी संस्कृती रुजवणारे प्राध्यापक सुधाकर नाडकर्णी हे खऱ्या अर्थाने या क्षेत्राचे अध्वर्यू आहेत. डिझायनर हा केवळ सेवा पुरवठादार नसून तो एक औद्योगिक-सामाजिक समस्या सोडवणारा तज्ञ व्यावसायिक असतो, हा कानमंत्र त्यांनी दिला.  
 
चित्रपट दिग्दर्शक अनिल झणकर यांनी घेतलेल्या मुलाखतीतून प्राध्यापक नाडकर्णी यांचे  अंतरंग उलगडत गेले. प्राध्यापक नाडकर्णी म्हणाले की, डिझाईन म्हणजे केवळ वस्तूंना आकार देणे किंवा सुशोभीकरण नव्हे तर समाजावर सकारात्मक प्रभाव टाकणारी ती एक प्रगल्भ विचार प्रणाली आहे. खरे डिझाइन शिक्षण एकतर्फी व्याख्यानातून नव्हे तर मुक्त चर्चेतून होते, त्यातून समाजातल्या अनेक घटकांना नवी, सकारात्मक दिशा मिळू शकते. तरुण मुलांना डिझायनींगच्या क्षेत्रात काम करण्याची चांगली संधी आहे. या क्षेत्रात नाविन्य आहे, त्यामुळे इथे काम करताना  कायम नवनवीन  अनुभव सामोरे येतात.

नाडकर्णी सरांनी आपल्या सगळ्या हयातीत डिझाइन क्षेत्रात नवीन उपक्रम रुजवले. जर्मनीला जाऊन घेतलेले डिझाईनचे शिक्षण, नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, पुढे आयआयटी मुंबई, तसेच आयआयटी गुवाहाटी  इथे डिझाईन सेंटर स्थापन करून, जे अनेक विद्यार्थी घडवले, पुढे वेलींगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये ‘डिझाईन थिंकिंग’ ही विचारप्रणाली रुजवून  ‘बिझनेस डिझाईन’ या  नवनिर्मिती आणि उद्योजकतेकडे वळवणार्‍या अभ्यासक्रमातून   व्यवस्थापन शिक्षणाला नवे आयाम दिले त्या त्या श्रमयात्रेची कहाणी या मुलाखतीतून उलगडत गेली. 

जगप्रसिद्ध वास्तुविशारद चार्ल्स कोरिया यांच्यासह  साल्ट लेकच्या सिटी सेंटरचे डिझायनिंग करताना तिथे कालीघाट चित्रकला अशा  पारंपरिक कलामूल्यांचा  वापर करून केलेली उभारणी  चेन्नईमध्ये महिंद्रा रिसर्च व्हॅलीच्या  डिझाइनमधला पर्यावरणाचा विचार, ‘विस्तार’ या फेस्टिवल ऑफ इंडियासाठी भारतीय वास्तुकलेवरील  प्रदर्शनात भारतीय उपखंडातील वास्तुकलेच्या परंपरांचा उत्क्रांतीक्रम आणि परस्परांतील गुंफलेले प्रभाव यांची मांडणी अशा अशा विविध प्रकल्पांबद्दल सरांना बोलते केले . या मुलाखतीतून उलगडत गेलेली सरांची  जीवनकहाणी एका विचारवंत डिझाईनर आणि गुरुच्या आयुष्याचा वस्तुपाठच दर्शवून गेली. 

‘बाय डिझाईन‘मध्ये  प्राध्यापक नाडकर्णी यांच्या गेल्या सहा दशकांच्या डिझाईन क्षेत्रातील कामगिरीचा वेध घेण्यात आला आहे. पण  या पुस्तकात केवळ केस स्टडीज नसून, प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारत  औद्योगिक सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न डिझाईनचे शिक्षण आणि कार्यपद्धती बदलण्याच्या त्यांच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा एक प्रेरणादायी दस्तावेज आहे. या पुस्तकाला चार्ल्स कोरिया यांचा ब्लर्ब लाभला असून हे पुस्तक या  क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला उपयुक्त ठरणार असून त्यामधून डिझाइनच्या संकल्पना आणि अन्य  विषयांचे मार्गदर्शन  मिळणे सोपे होणार असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केले.

Web Title : डिज़ाइन: केवल सौंदर्यशास्त्र नहीं, बल्कि समाज को सकारात्मक रूप से प्रभावित करने वाली प्रणाली।

Web Summary : प्रो. नाडकर्णी की पुस्तक का विमोचन उनके डिज़ाइन दर्शन का जश्न था, जिसमें औद्योगिक और सामाजिक समस्याओं को हल करने में डिज़ाइन की भूमिका पर जोर दिया गया। उन्होंने नवीन शिक्षा को बढ़ावा दिया, जो पीढ़ियों को एक समग्र दृष्टिकोण के साथ प्रेरित करती है जो मात्र सौंदर्यशास्त्र से परे है।

Web Title : Design: Not just aesthetics, but a system impacting society positively.

Web Summary : Prof. Nadkarni's book launch celebrated his design philosophy, emphasizing design's role in solving industrial and social problems. He promoted innovative education, inspiring generations with a holistic approach extending beyond mere aesthetics.