ताम्हिणीत खोल दऱ्या अन् घनदाट जंगल, 'ते' वळण 'संकटाचा मार्ग'; अनुभव नसलेल्या वाहनाचा ताबा सुटल्यास थेट दरीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 13:54 IST2025-11-21T13:53:38+5:302025-11-21T13:54:34+5:30
साहिल या तरुणाने सुमारे महिनाभरापूर्वीच ‘थार’ गाडीही घेतली. मात्र, ड्रायव्हिंगचा अजिबातच अनुभव नसल्यामुळे गाडी चालविणे त्याला नीटसे जमत नव्हते.

ताम्हिणीत खोल दऱ्या अन् घनदाट जंगल, 'ते' वळण 'संकटाचा मार्ग'; अनुभव नसलेल्या वाहनाचा ताबा सुटल्यास थेट दरीत
पुणे : मेहनतीच्या जोरावर गरिबीतून वर आलेल्या तरुण पोरांचा ताम्हिणी घाटात अपघात झाला आणि आई- वडिलांच्या हाताशी आलेली १७-१८ वर्षांची तरुण तुर्क पोरं देवाघरी गेली. एकाच परिसरात राहणारी एकमेकांची जिवलग मित्र एकाच वेळेस घरातून मोठ्या उत्साहात कोकणच्या सहलीसाठी गेली आणि परतली ती त्यांच्या निधनाची बातमीच. तब्बल सहा तरुणांच्या निधनाची बातमी शिवणे परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि अवघ्या गावावर शोककळा पसरली.
ताम्हिणी घाटात खोल दऱ्या, घनदाट जंगल आणि तीव्र वळणे असल्याने येथे अपघातांची मालिका कायम आहे. वेगात येणाऱ्या वाहनांचा ताबा सुटल्यास ती थेट दरीत ओढली जातात. घाटात लोखंडी रेलिंग असली तरी ती अपुरी ठरत आहेत. सोमवारी (दि. १७) मध्यरात्री पुण्याहून कोकणाकडे जाताना कोंडेथर गावानंतर घाट उतरताना येणाऱ्या पहिल्या अवघड वळणावर वाहनाचा ताबा सुटून हा अपघात झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या सहा जणांपैकी साहिल या तरुणाने सुमारे महिनाभरापूर्वीच ‘थार’ गाडीही घेतली. मात्र, ड्रायव्हिंगचा अजिबातच अनुभव नसल्यामुळे गाडी चालविणे त्याला नीटसे जमत नव्हते. अशातच नवी गाडी घेऊन ते कोकण दौऱ्यावर निघाले आणि घात झाला. त्यामुळे इतकी वर्षे प्रचंड मेहनतीने जे कमावले ते ड्रायव्हिंगने एका क्षणात गमावले.
याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुण्यातील उत्तमनगर आणि भैरवनाथनगर परिसरातील सहा तरुण सोमवारी रात्री ११:३०च्या सुमारास थार कारने (क्र. एमएच १२ वायएन ८००४ ) कोकणाकडे निघाले हाेते. मंगळवारी सकाळी एकाही तरुणाने पालकांशी संपर्क केला नाही. त्यानंतर पालकांनी तरुणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही. त्यानंतर घाबरलेल्या पालकांनी उत्तमनगर पोलिसांकडे धाव घेत सहा तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सीसीटीव्ही आणि मोबाइल लोकेशन तपासून ताम्हिणी घाट परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. पुणे व माणगाव पोलिस, रायगड आपत्ती व्यवस्थापन, मुळशी आपत्ती व्यवस्थापनच्या पथकांनी शोध घेतला. मात्र, हाती काहीच लागत नव्हते. अखेर गुरुवारी ड्रोनच्या साहाय्याने शोध मोहीम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बचाव पथकांनी शोध कार्य सुरू केले. अखेर ताम्हिणी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील कोंडेथर गावानंतर घाट उतरताना येणाऱ्या पहिल्या अवघड वळणावरील खोल दरीत थार आढळून आली.
खोल दरीमुळे बचाव कार्य आव्हानात्मक
वाहन आणि मृतदेह अत्यंत खोल दरीत असल्याने बचावकार्याला मोठी अडचण येत आहे. माणगाव पोलिस निरीक्षक निवृत्ती बोराडे, सहायक पोलिस निरीक्षक जाधव, विनोद तांदळे, शिवराज बांडे, रायगड आपत्ती व्यवस्थापन, मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती संस्था, शेलार मामा रेस्क्यू टीम, पुणे रेक्यू टीम, स्थानिक ग्रामस्थ यांच्यावतीने मदत कार्य करण्यात आले. तीन मृतदेह वर काढण्यात आले असून, उर्वतीन तीन मृतदेह दरीतून वर आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.