मंचरमध्ये भरदिवसा गोळीबार; सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात गोळी झाडून खून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 07:31 PM2021-08-01T19:31:07+5:302021-08-01T19:31:15+5:30

पूर्ववैमनस्यातून खुनाची ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Daytime shootings in Manchar; Murder by shooting the criminal in the head | मंचरमध्ये भरदिवसा गोळीबार; सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात गोळी झाडून खून

मंचरमध्ये भरदिवसा गोळीबार; सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात गोळी झाडून खून

Next
ठळक मुद्दे गुन्हेगाराचा दोन महिन्यापूर्वी झाला होता विवाह

मंचर : मंचरमध्ये पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराचा डोक्यात गोळी घालून खून करण्यात आला आहे. ओंकार उर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले(वय 24 रा. मंचर पांढरीमळा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना एकलहरे गावच्या हद्दीत आज घडली.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले हा सराईत गुन्हेगार होता. एका हमालाच्या खून प्रकरणात तो आरोपी होता. आज दुपारी एकच्या दरम्यान घरून भंगार घेऊन तो निघोटवाडी कॉलनी येथील पोल्ट्रीशेड वर गेला होता. भंगार तेथे ठेवून दुचाकीवर दोन मित्रांसोबत फकीरवाडी एकलहरे येथे निघाला होता. एकलहरे गावच्या हद्दीत त्यांची दुचाकी आली असता अज्ञात हल्लेखोराने ओंकार बाणखेले त्याच्या डोक्यात गोळी घालून त्याचा खून केला आहे. त्याच्या डोक्यात दोन गोळ्या मारण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. 

त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. मंचर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंभाते यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी निघाले आहेत.

पूर्ववैमनस्यातून खुनाची ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. खुनाच्या या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. खून झालेला ओंकार बाणखेले याच्यामागे आई, वडील, एक भाऊ असा परिवार असून दोन महिन्यापूर्वी त्याचा विवाह झाला होता. दरम्यान बाणखेले यांच्यासोबत असलेल्या दोघांकडून घटनेसंदर्भातील माहिती घेतली जात आहे. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. उशिरापर्यंत यासंदर्भात फिर्याद दाखल झाली नव्हती.

Web Title: Daytime shootings in Manchar; Murder by shooting the criminal in the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app