प्रियकराकडून सतत मारहाण; प्रियसीने भावाच्या मदतीने कायमचे संपवले, चाकणमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 18:55 IST2025-10-08T18:55:32+5:302025-10-08T18:55:46+5:30
दोघे एकत्रितच राहत असून प्रियकर तिला सतत छोट्या कारणावरून मारहाण करायचा, यातून त्या दोघांमध्ये भांडणे होत होती

प्रियकराकडून सतत मारहाण; प्रियसीने भावाच्या मदतीने कायमचे संपवले, चाकणमधील घटना
चाकण : प्रियकराच्या सततच्या मारहाणीला कंटाळून प्रियसीने तिच्या भावाच्या मदतीने प्रियकराचा खून केला आहे.या घटनेची उकल पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी ४८ तासात सर्व आरोपींना अटक केली आहे. मुकेश कुमार (वय.२४ वर्षे ) याचा गुरुवारी (दि.२) आरोपींनी खून केला होता.
चाकण जवळील कडाचीवाडी येथील ठाकरवस्ती मृतदेह आरोपींनी ब्लँकेटमध्ये गुंडाळून फेकून दिला होता.पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपास करत,संभाजीनगर येथून आकाश बिजलाउराम उराव (वय.२१ वर्षे) आरती कुमारी बिजला उराम उराव (वय.२३ वर्षे), बालमुनी कुमारी रामचंद्र उराव (वय.२१ वर्षे) या आरोपींना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी महिला आरती कुमारी व मुकेश यांची मागील तीन वर्षापासून प्रेम संबंध होते. ते दोघे एकत्रितच राहत होते. मात्र मुकेश हा तिला सतत छोट्या छोट्या कारणावरून मारहाण करायचा. यातून त्या दोघांमध्ये भांडणे होत होती. त्याच्या या मारहाणीला कंटाळूनच आरतीने तिचा भाऊ व आणखी एक साथीदाराच्या मदतीने हत्याराने तोंडावर डोक्यावर वार करत मुकेशचा खून केला व पुरावा नष्ट करण्याच्य उद्देशाने मृतदेह निर्जन स्थळी फेकून दिला. मात्र पोलिसांनी कौशल्य पूर्ण तपास केला असता सीसीटीव्ही फुटेज तसेच काही व्यक्ती ह्या अचानक खोली सोडून गेल्याच्या संशयातून पोलिसांनी आरोपीचा माग घेतला. आरोपी संभाजीनगर येथे लपून बसल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी संभाजीनगर येथून आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखा तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे,पोलिस अंमलदार राजाराम लोणकर,योगेश आढारी,राम मेरगळ, सागर जैनक, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ,समीर काळे,शेखर खराडे यांनी केली आहे.