शेततळ्याच्या काठावर मुलांचे बूट-चप्पल आढळले; पाण्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू, जुन्नरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 15:15 IST2025-11-24T15:15:21+5:302025-11-24T15:15:48+5:30
मुलांचे वडील पाच महिन्यांपूर्वी नोकरीसाठी दुबईला गेले होते, त्यानंतर मुलांची काळजी त्यांची आई आणि आजी घेत होत्या

शेततळ्याच्या काठावर मुलांचे बूट-चप्पल आढळले; पाण्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू, जुन्नरमधील घटना
जुन्नर : जुन्नरमधील जुन्या बसस्थानकासमोर असलेल्या इदगाह मैदानाच्या परिसरातील शेततळ्याजवळ खेळण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिण-भावंडांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. आफान अफसर इनामदार (वय १०) आणि रिफत अफसर इनामदार (७, रा. इस्लामपुरा, खडकवस्ती, जुन्नर), अशी या बहीण-भावंडांची नावे आहेत. या मुलांचे वडील पाच महिन्यांपूर्वी नोकरीसाठी दुबईला गेले होते, त्यानंतर मुलांची काळजी त्यांची आई आणि आजी घेत होत्या.
ही दोन्ही बहीण-भावंडे शनिवारी सायंकाळी चार वाजल्यापासून बेपत्ता असल्याचे त्यांच्या आईला लक्षात आल्यावर त्यांनी त्यांना शोधायला सुरुवात केली. त्यांचा समज होता की ही मुले नेहमीप्रमाणे त्या परिसरातच खेळण्यासाठी गेली असावीत. मात्र, सायंकाळपर्यंत त्यांचा काहीही ठावठिकाणा लागला नाही, त्यामुळे त्यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात याबाबत कळवले. जुन्नर पोलिसांचे पथकही शोधकार्य सुरू करण्यात आले. या परिसरात बिबट्याचे वावर असल्याने वनविभागाचे पथकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ड्रोनच्या साह्याने या दोन्ही बहीण-भावंडांचा शोध घेतला जात होता. त्या दरम्यान, सायंकाळी शेततळ्याच्या काठावर या लहान मुलांचे बूट-चप्पल आढळले. त्यानंतर रात्री १० वाजता जुन्नर रेस्क्यू टीमचे राजकुमार चव्हाण आणि इतर सदस्यांनी शेततळ्यात शोध घेतल्यावर मुलं पाण्यात बुडालेली असल्याचे समोर आले. त्यांना त्वरित पाण्याबाहेर काढून ‘जुन्नर रेस्क्यू टीम’च्या रुग्णवाहिकेमार्गे जुन्नरच्या शिवछत्रपती रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जाहिद हसन यांच्या तपासणीनंतर उघडकीस आले की, या मुलांचा चार तासांपूर्वी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. ही घटना कळताच, रुग्णालय परिसरात नागरिकांची गर्दी झाली. पोलिस निरीक्षक किरण अवचर, वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण आणि संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.