मुलांची रडारड, आरडाओरडा; चिमुकल्यांना कोंडून अंगणवाडी सेविका गेल्या मिटिंगला, हिंजवडीतील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:56 IST2025-11-27T15:55:53+5:302025-11-27T15:56:25+5:30
शिक्षक नाहीत आणि अचानक दरवाजा बंद केल्याने, लहान मुलांनी घाबरून रडायला सुरुवात केली. हा प्रकार शेजारी उभ्या असणाऱ्या काही पालकांच्या लक्षात आला. कुलूप लावले असल्याने पालक सुद्धा हतबल झाले होते

मुलांची रडारड, आरडाओरडा; चिमुकल्यांना कोंडून अंगणवाडी सेविका गेल्या मिटिंगला, हिंजवडीतील धक्कादायक प्रकार
हिंजवडी : ग्रामपंचायत सदस्याने मिटिंगसाठी ग्रामपंचायत कार्यालयात बोलावल्याने हिंजवडी मधील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या. मात्र, चक्क चिमुकल्यांना कोंडून काही सेविका आणि मदतनीस गेल्याने घाबरून मुलांनी रडायला सुरुवात केली. बुधवार (दि.२६) रोजी हिंजवडी मधील अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये हा प्रकार घडला.
म्हातोबा टेकडीजवळ असणाऱ्या अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये एकूण वीस विद्यार्थी असून, सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे या कार्यरत आहेत. शिक्षक नाहीत आणि अचानक दरवाजा बंद केल्याने, लहान मुलांनी घाबरून रडायला सुरुवात केली. हा प्रकार शेजारी उभ्या असणाऱ्या काही पालकांच्या लक्षात आला. कुलूप लावले असल्याने पालक सुद्धा हतबल झाले होते. त्यांनी तात्काळ एकात्मिक बालविकास सेवा योजना, अंगणवाडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. वरिष्ठांकडून संपर्क झाल्यावर, संबंधित सेविका आणि मदतनीस त्याठिकाणी पोहचल्या आणि दरवाजा उघडून चिमुकल्यांना दिलासा दिला. दरम्यान, हिंजवडी मध्ये एकूण सहा अंगणवाडी असून, प्रकार घडला त्याठिकाणी वीस विद्यार्थी शिकत आहेत. येथील, सेविका आणि मदतनीस यांनी केलेल्या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, याची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी पालक करत आहेत.
याठिकाणी आम्ही मुलांना सकाळच्या वेळेत अंगणवाडी मध्ये घातले आहे. मुलाची तब्बेत ठीक नसल्याने मॅडम नी मला फोन केला, मी त्या ठिकाणी गेले होते. अचानक, अंगणवाडीचा सेफ्टी गेट लॉक करून, सेविका आणि मदतनीस मिटिंग साठी निघून गेल्या. मात्र, त्यामुळे मुलं रडायला लागली. आम्ही,मॅडम ला फोन लावला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे, वरिष्ठांना याची कल्पना दिल्याने सेविका आणि मदतनीस काही वेळाने परत आल्या आणि दरवाजा उघडला. त्यानंतर, त्यांनी उद्धट वर्तन करून आम्हालाच सुनावलं. यांच्यावर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे.- उज्वला जोगदंड, पालक