बालदिन विशेष! सांगा, मुलांनी खेळाचं कुठ? शहरात मैदाने आहेत कुठं? मुलांचा श्वास ४ भिंतींमध्ये कोंडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 13:04 IST2025-11-14T13:03:23+5:302025-11-14T13:04:09+5:30

मोबाईलच्या आहारी गेलेली पिढी हळूहळू तणाव, चिडचिड आणि एकटेपणात अडकत असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

Children's Day Special! Tell me, where can children play? Where are the playgrounds in the city? The children's breath is trapped within four walls | बालदिन विशेष! सांगा, मुलांनी खेळाचं कुठ? शहरात मैदाने आहेत कुठं? मुलांचा श्वास ४ भिंतींमध्ये कोंडला

बालदिन विशेष! सांगा, मुलांनी खेळाचं कुठ? शहरात मैदाने आहेत कुठं? मुलांचा श्वास ४ भिंतींमध्ये कोंडला

पुणे : शहरात झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणामुळे, आता खुली मैदाने दिसणे जवळपास दुरापास्त झाले आहे. यामुळे मुलांनी खेळायचं कुठं? असा सवाल पुणेकरांनी उपस्थित केला आहे. ७५ लाख लोकसंख्या असलेल्या पुण्यात लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ १०५ महापालिकेची बंदिस्त क्रीडा संकुल आहेत, त्यातही जवळपास २७ क्रीडा संकुल बंदच आहे. काँक्रिटीकरणाच्या जंगलात मुलांचा श्वास मैदानअभावी चार भिंतींमध्ये कोंडला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कधी काळी क्रिकेट, लगोरी, पकडा-पकडीच्या आवाजाने दुमदुमणाऱ्या पुण्यात लहान मुलांच्या किलबिलाचा नव्हे, तर वाहनांचा आवाज ऐकू येतो आहे. कारण मुलांना खेळण्यासाठी आता खुली मैदानेच उरलेलीच नाहीत आणि जी थोडी उरली आहेत, तीही बांधकामांच्या सावलीत हरवून गेली आहेत. आज मुलं मैदानावर नाहीत, तर घरात एका कोपऱ्यात किंवा सोसायटीच्या कट्ट्यावर मोबाईलमध्ये अडकली आहेत हेच आजच्या बालदिनाचं कटू वास्तव आहे.

शहराची वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने होणारा विकास यामुळे मोकळ्या जागा राहिलेल्याच नाहीत. पुण्याच्या सत्तर लाखांच्या घरात असलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत सध्या महापालिकेची केवळ १०५ सार्वजनिक क्रीडा संकुल आहेत, याचा अर्थ हजारो मुलांमागे फक्त एकच क्रीडा संकुल आहे.

गेल्या काही वर्षांत अनेक मोकळी जागा निवासी प्रकल्प, पार्किंग, विवाहमंडप आणि व्यापारी वापरासाठी देण्यात आली आहे. परिणामी, मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित जागा मिळणं अशक्य झालं आहे. काही ठिकाणी शाळांच्या खेळाच्या मैदानांवर क्रीडा स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या मुलांचे सराव चालू असतात, मग इतर मुलांनी खेळायचं कुठं? महापालिकेच्या बहुतांश शाळेला मैदानच नाही, तर मोकळ्या मैदानावर बांधकामं उभी राहत आहेत. यामुळे मुलांचा कल आता मैदानी खेळांवरून मोबाईल गेम्सकडे वळला आहे. फोनवरचे ‘गेम’, ‘रील्स’, ‘व्हिडीओ’ हेच त्यांचं “नवं मैदान” बनलं आहे. तासन्तास स्क्रीनसमोर बसल्याने मुलांच्या डोळ्यांवर, मनावर आणि शरीरावर विपरीत परिणाम होत आहेत. मुलांच्या शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी खुली मैदाने महत्त्वाची असतात. तिथे ते हार-जीत, सहकार्य, संयम शिकतात, पण आजच्या डिजिटल जीवनशैलीतून ही सामाजिक शिकवण नाहीशी होत चालली आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

मुलांची सक्रियता आणि आनंदही कमी

आजची मुलं मैदानं सोडून मोबाईलमध्ये अडकली आहेत. पूर्वी दुपारभर खेळणारी, धावणारी, गटात रमणारी मुलं आता स्क्रीनच्या मर्यादेत बंदिस्त झाली आहेत. मैदान हे फक्त खेळाचं ठिकाण नसून ते मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासाचं केंद्र असतं. इथेच मुलं टीमवर्क, सहनशीलता, स्पर्धा आणि मैत्री शिकतात, पण आज मैदाने कमी झाली, तशीच मुलांची सक्रियता आणि आनंदही कमी झाला. मोबाईलच्या आहारी गेलेली पिढी हळूहळू तणाव, चिडचिड आणि एकटेपणात अडकत असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

महापालिकेच्या अखत्यारित लहानापासून मोठ्यांपर्यंत १०५ क्रीडा संकुल आहेत. ती सर्व बंदिस्त आहेत. -प्रदीप महाडिक, प्रशासक अधिकारी

शाळा जितकी महत्त्वाची आहे, तितकंच मैदानही आवश्यक आहे. प्रत्येक शाळेत खेळाचे मैदान असणे अत्यावश्यकच आहे, पण त्यासोबत सार्वजनिक ठिकाणीही मैदाने जपली गेली पाहिजेत आणि त्यांची संख्या वाढवली पाहिजे. मैदानांचा अभाव म्हणजे मानसिक अस्वस्थतेची लाट ओढवण्याचे आमंत्रणच आहे आणि त्या लाटेला तोंड देण्याची ताकद जगातील कोणत्याही सरकारकडे नाही. -  डॉ. भूषण शुक्ला, बाल मानसोपचारतज्ज्ञ.

मुलांच्या आयुष्यात मैदान म्हणजे फक्त खेळाचं ठिकाण नाही, तर त्यांच्या आनंदाचं, आरोग्याचं आणि आत्मविश्वासाचं शाळाच असते. अभ्यासाप्रमाणेच मैदानही आवश्यक आहे. कारण पुस्तकं बुद्धी घडवतात, पण मैदान मन आणि शरीर दोन्ही घडवतं. - करुणा जाधव, पालक

पुणे महापालिका क्रीडा विभागाच्या अखत्यारित बंद क्रीडा संकुल

१) राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल, आदिशक्ती योग भवन शेजारी, पाषाण

२) जलतरण तलाव क्रीडा संकुल, नाला गार्डन शिवदर्शन, पर्वती
३) मदर टेरेसा क्रीडा संकुल, रणकपूर सोसायटी, विश्रांतवाडी

४) कै. केशवराव ढेरे जलतरण तलाव, चिमा गार्डन, येरवडा
५) भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जलतरण तलाव व्यायामशाळा, महादेव मंदिर, सुतारवाडी-पाषाण

६) औंध जलतरण तलाव, औंध गाव
७) स्व. खासदार विठ्ठलराव तुपे क्रीडा संकुल, हडपसर

८) स्व. खासदार विठ्ठलराव तुपे शूटिंग रेंज, मगरपट्टा रोड, हडपसर
९) वसंतराव भागवत क्रीडा संकुल, कवडी अड्डा, सदाशिव पेठ

१०) छत्रपती संभाजी महाराज व्यायामशाळा, कोंढवा
११) प्ले ग्राउंड, बालेवाडी

१२) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे मल्टिपर्पज हॉल, कर्वेनगर
१३) लोकनेते गोपीनाथ मुंडे व्यायामशाळा, कोंढवा बुद्रुक

१४) स्व. आमदार सूर्यकांत आप्पा लोणकर व्यायामशाळा, संत गाडगेबाबा मनपा शाळेजवळ, कोंढवा
१५) झाशीची राणी लक्ष्मीबाई योगा केंद्र, वारजे

१६) तक्षशिला क्रीडानगरी, साकोरे नगर, विमान नगर रोड
१७) कै. बाळासाहेब रामभाऊ कवडे क्रीडांगण व क्रीडा संकुल, घोरपडी गाव

१८) डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल, सहकारनगर समतानगर, पर्वती
१९) बुद्धवासी चिमाजी अल्हाट क्रीडांगण, महंमदवाडी

२०) कै. विठ्ठल नामदेव जाधव क्रीडा संकुल, वडगाव
२१) कै. अण्णासाहेब मारुती कोंढरे पाटील चिल्ड्रन प्लेग्राउंड, आंबेगाव बुद्रुक

२२) भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा संकुल, वडगाव
२३) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडियम चिखलवाडी, बोपोडी

२४) स्वामी विवेकानंद जलतरण तलाव व जिम्नॅशियम, बावधन
२५) बॅडमिंटन हॉल, वारजे

२६) ह. भ. प. पुंडलिक विठ्ठल टिळेकर क्रीडांगण, मौजे कात्रज, सुखसागर नगर
२७) पुणे पेठ बावधन व्यायामशाळा, बावधन

Web Title : पुणे में खेल के मैदान गायब: बच्चे घरों में कैद, खुले स्थानों की चाह।

Web Summary : पुणे में खेल के मैदानों की कमी से बच्चे घरों में और स्क्रीन पर कैद हैं। सीमित खेल परिसर और परिवर्तित खुले स्थान बच्चों के शारीरिक और सामाजिक विकास को प्रभावित करते हैं, विशेषज्ञों ने चेतावनी दी है। स्कूलों में भी मैदानों की कमी है।

Web Title : Pune's vanishing playgrounds: Kids confined indoors, craving open spaces.

Web Summary : Pune faces a shortage of playgrounds, forcing children indoors and onto screens. Limited sports complexes and converted open spaces impact kids' physical and social development, experts warn. Schools also lack grounds.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.