मुळा- मुठा, भीमा नदीच्या पाण्यात रासायनिक फेस, विषारी पाण्यामुळे आरोग्य, पिके धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 17:42 IST2026-02-05T17:41:45+5:302026-02-05T17:42:13+5:30
पुणे महापालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे आहेत, परंतु ती फक्त नावालाच आहेत, त्यामुळे पाण्यावर काहीही प्रक्रिया होत नाही.

मुळा- मुठा, भीमा नदीच्या पाण्यात रासायनिक फेस, विषारी पाण्यामुळे आरोग्य, पिके धोक्यात
रांजणगाव सांडस : पुणे जिल्ह्यातील शिरूर व दौंड, हवेली तालुके हे पाण्याच्या दृष्टीने समृद्ध तालुके म्हणून ओळखले जातात. कारण या तिन्ही तालुक्यांना मुळा, मुठा आणि भीमा नद्यांचा पाण्याचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. ऋग्वेदात म्हटले आहे की ज्या गावाची नदी स्वच्छ असते, त्या गावाचे आरोग्य चांगले असते; परंतु पवित्र चंद्रभागा नदी पंढरीत चंद्रकोर होण्याआधीच फेस वाहणारी विषारी गंगा झाली आहे. पूर्वी पुणे शहरातून वाहणारी मुळा-मुठा नदी ही केवळ शहराची जीवनवाहिनी नव्हती, तर नदीकाठावरील नागरिकांचे आरोग्य रक्षण करणारी मानली जात होती.
दरवर्षी पावसाळ्यात, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला धरणे भरल्यावर या नद्यांमध्ये पाणी सोडले जाते. तथापि, सध्याच्या काळात पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या वाढत्या शहरीकरणामुळे, झोपडपट्टी आणि औद्योगिकीकरणामुळे नदी पात्रात घाणीचे प्रमाण वाढले आहे. प्लास्टिक, मैला, रासायनिक घाण हे सर्व काही प्रक्रिया न करता नदीत सोडले जाते. त्यामुळे मुळा-मुठा नदी गटारगंगेत रूपांतरित झाली आहे.
पुणे शहर व दौंड, हवेली, शिरूर तालुक्यांतील मुळा-मुठा भीमा नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे आरोग्य आणि शेतीचे बिघडलेले गणित धोक्याचा इशारा देत आहे. मुळा-मुठा भीमा नद्यांचा संगम श्री क्षेत्र रांजणगाव सांडस वाळकी बेट परिसरात आहे, आणि पुढे भीमा नदी उजनी धरणाकडे वाहते. पारगाव तालुका दौंडपासून भीमा नदी म्हणून ओळखली जाते. पारगाव येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून शेतीला वर्षभर पाणीपुरवठा होईल असे केले जाते. बंधाऱ्यावरील प्लेटा बसवल्यानंतर बारमाही पाणी मिळाल्याने शिरूर, दौंड आणि हवेली तालुक्यांतील लाखो एकर जमीन बागायती झाली आहे. यामुळे भागातील ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून साखर कारखानदारी चालू आहे. शेतांना मुबलक पाणी असल्याने ऊस हे मुख्य पीक आहे. बंधाऱ्यावर प्लेटा टाकल्यानंतर पाण्यावर तेलांचा तवंग तयार होतो. शहरातील मैला आणि रासायनिक घाण नदीच्या तळात साचल्यामुळे जलचरांचे जीवनमान धोक्यात आले आहे. सकाळ- संध्याकाळी नदीकाठच्या गावांत डासांचा त्रास होत असतो. विविध आजार उद्भवल्यामुळे आणि रासायनिक पाण्याचा शेतीत वापर झाल्यामुळे उसाची आणि इतर पिकांची उंची वाढत नाही. जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहे. ग्रामीण भागातील शेतकरी याच पाण्याचा उपयोग शेतीसाठी करतात. हे पाणी उजनी धरणांतून थेट सोलापूर जिल्ह्यात जाते. पुणे महापालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे आहेत, परंतु ती फक्त नावालाच आहेत, त्यामुळे पाण्यावर काहीही प्रक्रिया होत नाही.
दळणवळणाच्या दृष्टीने शहरी भागात मेट्रो रेल्वे, पीएमपीएलची बस ग्रामीण भागात पोहोचली, पण आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या नद्या जोड प्रकल्प, जलपर्णी हटाव, नदी बचाव, मैला शुद्धीकरण केंद्र या गोष्टी फक्त कागदावरच दिसतात. प्रत्यक्षात त्या अमलात आणल्या जात नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नदीकाठावरील गावांचे आयुर्मान घटले असून अतिरिक्त रासायनिक पदार्थांमुळे जमिनी नापीक झाल्या आहेत. रोगराई गावाच्या उंबरठ्यावर थांबलेली आहे. - गोरख डूबे, निसर्गप्रेमी
दूध उत्पादक जनावरांची आरोग्य पत्रिका शेतकरी वर्गाने तयार करावी. भीमा, मुळा मोठ्या नद्यांच्या दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे आणि दूध उत्पादक जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. - निखिल तांबे, संचालक कात्रज दूध संघ
शेतकरी वर्गाने सेंद्रिय शेतीचा अवलंब करून पालेभाज्या, फळभाज्या पिकवाव्यात. - बापू राक्षे पाटील, शेतकरी