सीसीटीव्ही तपासले, मोबाईल लोकेशन पाहिले, पोलिसांना ताम्हिणी घाटाचा संशय बळावला, गाडीसह मृतदेह दिसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:17 IST2025-11-20T18:17:19+5:302025-11-20T18:17:37+5:30
पुण्याकडून कोकणाकडे जाताना रायगड जिल्हयातील कोंडेथर गावांनतर घाट रस्त्यावर पहिल्याच तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन दरीत कोसळल्याचा अंदाज आहे

सीसीटीव्ही तपासले, मोबाईल लोकेशन पाहिले, पोलिसांना ताम्हिणी घाटाचा संशय बळावला, गाडीसह मृतदेह दिसले
पिरंगुट : मुळशी तालुक्याची हद्द संपताच पुणे व रायगड जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या ताम्हिणी घाटा मध्ये एका थार गाडीचा अपघात झाला असून ही गाडी जवळपास 400 ते 500 फूट खोल दरी मध्ये जाऊन कोसळली असुन या अपघातामध्ये आतापर्यंत चार युवकांचा मृत्यू झाला आहे.
पुणे येथून कोकणामध्ये फिरण्यासाठी निघालेल्या सहा युवकांच्या थार गाडीचा अपघात होऊन ही गाडी ताम्हिणी घाटा मध्ये (जि. रायगड) जवळपास चारशे ते पाचशे फुट खोल दरीमध्ये जाऊन कोसळली. या दुर्घनेमध्ये सहा ही युवकांचा मृत्यु झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. परंतु ड्रोनच्या शोध पथकास आत्तापर्यंत फक्त चारच मृतदेह दिसून आलेले आहेत. तर इतर युवकांचा शोध सुरु असून त्या चार युवकांचे मृतदेह दरीतून वर आणण्यासाठी बचाव पथकाचे प्रयत्न सुरु आहेत.
पालकांनी दिली होती हरवल्याची तक्रार
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी (ता.१७) रात्री ११.३० वा. चार चाकी थार गाडीने कोकणात फिरण्यासाठी प्रथम शहाजी चव्हाण (वय-२२,रा. कोंढवे धावडे, पुणे) पुनित सुधारक शेट्टी, (वय-२०, रा. कोपरे गाव, उत्तमनगर, पुणे), साहील साधु बोटे (वय-२४, रा. कोपरे गाव, उत्तमनगर, पुणे) श्री महादेव कोळी (वय-१८, रा. कोपरे गाव, भैरवनाथ नगर, पुणे), ओंकार सुनील कोळी (वय-१८, रा. कोपरे गाव, भैरवनाथ नगर, पुणे,) शिवा अरुण माने (वय-१९, रा. कोपरे गाव,भैरवनाथ नगर, पुणे) हे सर्व सहा युवक निघाले होते. परंतु दुसऱ्या दिवसापासून त्या सर्व युवकांचा कोणताही संपर्क त्यांच्या घरच्यांशी त्यांच्या मित्रांशी तसेच नातेवाकांशी झाला नाही. त्यामुळे चिंतेत पडलेल्या त्या युवकांच्या पालकांनी या घटनेबाबत उत्तमनगर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात
त्यानंतर मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास करण्यास सुरुवात केली असता सीसीटीव्ही तसेच त्या युवकांच्या फोनच्या लोकेशन च्या माध्यमातून तपास करता ते ताम्हिणी घाट परिसरापर्यंत येऊन पोहचले. तेव्हा गुरुवारी (ता.२०) पोलिसांनी फोनच्या लोकेशन आधारे ताम्हिणी घाटामधील (जि. रायगड) अवघड वळणावर असलेल्या अपघात प्रवणग्रस्त ठिकाणी ड्रोनच्या मदतीने शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांना खोल दरी मध्ये त्या युवकांची थार गाडी व चार युवकांचे मृतदेह त्यांना त्या ड्रोन च्या माध्यमातून दिसून आले. परंतु ती गाडी व मृतदेह हे खुप खोल दरीमध्ये असल्यामुळे शोध कार्य करणे हे खुपच कठीण झाले होते. तेव्हा यामध्ये माणगाव पोलिस, रायगड आपत्ती व्यवस्थापन, मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन व स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने हे शोध कार्य करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पोलिसांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असून हा अपघात सोमवारी (ता.१७) मध्यरात्रीच्या दरम्यान झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे हा अपघात रात्रीच्यावेळी झाल्याने तो कुणाच्याही लक्षात आला नाही.