मंगेशकर हॉस्पिटलला बांधकामासाठी जमीन, मंत्रिमंडळाची मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 17:28 IST2025-02-19T17:27:53+5:302025-02-19T17:28:35+5:30
या ट्रस्टला हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरसाठी एरंडवणा येथे जमीन देण्यात आली आहे.

मंगेशकर हॉस्पिटलला बांधकामासाठी जमीन, मंत्रिमंडळाची मान्यता
पुणे : दीनानाथ मंगेशकर फाऊंडेशन हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन नाममात्र दराने वार्षिक भाडेपट्ट्याने देण्यास मंगळवारी (दि. १८) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या ट्रस्टला हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरसाठी एरंडवणा येथे जमीन देण्यात आली आहे. याशिवाय ट्रस्टने कर्वेनगर येथील जमीन खरेदी केली आहे.
या दोन्ही मिळकतीच्या दरम्यान हा नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यासाठी ७९५ चौरस मीटर जमिनीची आवश्यकता असल्याची मागणी ट्रस्टने केली होती. त्यानुसार ही जमीन वार्षिक एक रुपया या नाममात्र दराने भाडेपट्ट्याने देण्यास मंजुरी देण्यात आली.
नाल्यावरील पुलाच्या बांधकामाचा खर्च हा संबंधित ट्रस्ट करणार आहे. या पुलामुळे रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, रुग्णवाहिका, रुग्णांच्या नातेवाइकांची वाहने व ट्रस्टचे संबंधित वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांना ये-जा करणे सुकर होणार आहे.